हवा प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन

नियमावलीचे पालन न केल्यास तातडीने काम थांबवण्याचे आदेश

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिका मार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यानुसार महापालिकेने धूळ प्रदुषण नियंत्रणासाठी २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, संबंधितांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

हवा प्रदुषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले आहे. तर १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना त्यांना सुमारे ४ लाख रुपयांचा दंड आकारुन अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. उर्वरित ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये? अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तत्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री ‘पर्यावरण विभाग'ने सतत करावी, असेही उपायुवत माळवी यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ‘ठाणे महापालिका पर्यावरण विभाग'ने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांचा आढावा २ जानेवारी रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (१) संदीप माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पद्मश्री बैनाडे, उपायुक्त सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, मेट्रो, एमएसआरडीसी, परिवहन विभाग, पोलीस आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हवा प्रदुषणाचा परिणाम सगळ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे उपायुवत माळवी यांनी स्पष्ट केले. मेट्रो आणि एमएसआरडीसी यांनीही कामे करताना हरित जाळी लावून धूळ नियंत्रण करावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत, हवा प्रदुषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १.७० लाख रुपये दंडाची कारवाई केली असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाणे मधील विकासकांद्वारे त्यांच्या प्रकल्पात ५० ठिकाणी हवा प्रदुषण मोजणीचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची सातत्याने पाहणी ‘पर्यावरण विभाग'मार्फत केली जात आहे. इतर व्यावसायिकांनीही सदर यंत्रणा ताबडतोब बसवावी. त्याबाबत हयगय झाल्यास कारवाई करावी.
-संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (१)-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सहभाग, सहकार्य हाच ‘नैना'च्या यशस्वीतेचा मंत्र