गोपाळनगर येथे मुख्य रस्त्यावर वाहतेय नाल्यातील घाण पाणी
भिवंडी : भिवंडीतील कल्याण नाक्याजवळ असलेले गोपाळनगर शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती मानली जाते. मात्र, या लोकसंकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नाल्याची दुरुस्ती गेल्या काही महिन्यापासून होत नसल्याने गोपाळनगरच्या प्रवेशद्वारावर नेहमी नाल्याचे घाण पाणी आणि चिखल साचलेला असतो.
रस्त्यावर नेहमीच पाणी साचल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे मागणी करुन देखील येथील नाल्याची बांधकाम विभागाकडून दुरुस्ती केली जात नाही. तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून नाल्याची सफाई केली जात नाही. त्यामुळे त्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयाच्या मुख्य हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळनगरच्या मुख्य रस्त्याच्या दुर्दशेची माहिती प्रभाग समिती-२ चे सहाय्यक आयुक्त किंवा शहर अभियंता यांच्याकडेही नाही.
गोपाळनगरच्या प्रवेशद्वाराजवळ दादासाहेब दांडेकर विद्यालय आहे. यामध्ये प्राथमिक ते माध्यमिक पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात.त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी पायीच शाळेत येतात. मात्र, त्यांना नाल्याच्या या घाण पाण्यातून जावे लागते. याशिवाय येथे नेत्र रुग्णालये, दंत रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्स आहेत. तसेच लोक संकुलास लागून कच्च्या कापडाची कार्यालये असल्याने नेहमी मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे नागरिकांची देखील नेहमीच वर्दळ असते. अशा स्थितीत गोपाळनगरचा संपूर्ण रस्ता अनेक ठिकाणी नादुरुस्त स्थितीत आहे. तसेच या लोकवस्तीत रस्त्यावरील चेंबर उघडे आहेत.
माजी नगरसेवक तथा समाजवादी पक्षाचे नेते अजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळनगरच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळील वाहतूक कार्यालयालगत तेथील नाला गेल्या काही वर्षांपासून उघड्या अवस्थेत आहे. तेथे पावसाळ्यात खूप पाणी साचलेले असते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुमारे २ फुट पाणी साचते. नाल्याची दुरुस्ती न केल्याने नाला पूर्णपणे तुडुंब भरला आहे. यासाठी महापालिकेला अनेकदा पत्रेही लिहिली आहेत. मात्र, महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली; मात्र याबाबत बांधकाम विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक यांनी प्रभाग समितीचे कनिष्ठ अभियंता विनोद भोईर यांच्याशी बोलून माहिती देणार असल्याचे सांगितले. तर दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचे प्रभाग समिती-२ चे सहाय्यक आयुक्त माणिक जाधव म्हणाले.