सफाई कामगारांच्या मागण्यांकडे महापालिकेची पाठ ?

वाशी : स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई महापालिका प्रशासनाची मान उंचावणारे सफाई कामगार ‘समान काम, समान वेतन', य मागणीची तड लावण्यासाठी २८ डिसेंबर पासून उपोषणाला बसले आहेत. मात्र, उपोषणाला पाच दिवस झाले तरी महापालिका प्रशासनाने उपोषणाची दखल न  घेत सफाई कामगारांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सफाई कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महापालिकेत कार्यरत कामगारांना ‘समान काम, समान वेतन' मिळावे, अशी सफाई कामगारांची मागणी आहे. या मागणीची तड लावण्यासाठी वारंवार आंदोलने करण्यासह मोर्चे काढण्यात येत आहेत. याबाबत राज्य नगरविकास खात्याने देखील अधिनियमातील तरतुदी आणि नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सप्टेंबर-२०२४ मध्ये दिले आहेत. त्यानुसार ‘समान काम, समान वेतन' धोरण ठरविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती स्थापना  करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समिती द्वारे देण्यात आलेल्या अहवालामध्ये ‘समान काम, समान वेतन' धोरणानुसार वेतन दिल्यास कामगारांचे वेतन कमी होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि सफाई कामगारांच्या मागणीप्रमाणे २००७ साली नियुक्त कायम कर्मचाऱ्यांना आज रोजी मिळणारे वेतन सर्व विभागातील कामगारांना मिळावे, या मागणीसाठी प्रथमतः २७ डिसेंबर २०२४ रोजी समता समाज संघटना मार्फत महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चाची देखल महापालिका प्रशासनाने न घेतल्याने कामगारांनी अखेर २८ डिसेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. मात्र, आमरण  उपोषण आंदोलन सुरु करुन १ जानेवारी दिवस उजाडला तरी देखील उपोषणकर्त्या कामगारांची महापालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती ‘समता समाज संघटना'चे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिली.

---------------------------------------
विधानसभा निवडणूक पूर्वी सफाई कामगारांनी आंदोलन केले होते.यावेळी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले होते. मात्र, आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी देखील सफाई कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे.
------------------------------------
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर दरवर्षी आकर्षक रोषणाई केली जाते. महापालिका मुख्यालयावरील रोषणाई पाहण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात. मात्र, यंदा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने देशात एक आठवडा राष्ट्रीय दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे महापालिकेने विद्युत रोषणाई केली नव्हती. मात्र, नववर्षाची विद्युत रोषणाई बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना कामगारांनी आपल्या मागण्यांचे फलक दाखवून लक्ष वेधून घेतले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गोपाळनगर येथे मुख्य रस्त्यावर वाहतेय नाल्यातील घाण पाणी