नवी मुंबईत थर्टीफर्स्ट, नववर्ष स्वागत शांततेत

नवी मुंबई : ‘थर्टीफर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांकडून ‘थर्टीफर्स्ट'च्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'च्या मोहिमेत मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे २६६ तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई कली आहे. त्याशिवाय पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहन चालकांवर देखील कारवाई कारवाई केली आहे.    

याहीवर्षी नवी मुंबईकरानी मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात नववर्ष साजरा केला. ‘थर्टीफर्स्ट'च्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक, सिग्नल, जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे शहरात ‘थर्टीफर्स्ट'च्या मध्यरात्री कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. थर्टीफर्स्ट आणि नववर्ष शांततेत साजरा झाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे.    

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी ‘थर्टीफर्स्ट'च्या बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक आणि भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांची १ जानेवारी २०२५ रोजी पहाटे पर्यत तपासणी केली. या तपासणीत २६६ तळीराम सापडल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. या कारवाई बरोबरच वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीवरुन फिरणारे, सिटबेल्ट न लावता फिरणारे तसेच दुचाकीवरुन ट्रिपल सिट फिरणारे आदि वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २३५७ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त काकडे यांनी सांगितले.  

तसेच यापुढील काळात देखील वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह मोहीम आकडेवारी...
थर्टीफर्स्ट निमित्त नवी मुंबई वाहतूक विभागाच्या १६ युनिट कडून आपापल्या हद्दीत ३१ डिसेंबर रोजी रात्री ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'ची विशेष मोहीम राबविण्यात आली. यात वाशी २४, एपीएमसी १५, रबाले २०, महापे १३, कोपरखैरणे १७, तुर्भे-३२, सीवुडस्‌ १३, सीबीडी १७, खारघर १४, कळंबोली २०, तळोजा १६, पनवेल शहर २२, नवीन पनवेल १०, उरण १३, न्हावाशेवा १५ आणि गव्हाणफाटा ५ अशा एकूण २६६ तळीरामांचा समावेश आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मद्य तस्करांविरोधात ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'ची धडक मोहीम