प्रदुषण नियमांचे उल्लंघन; १६४ विकासकांना महापालिकेच्या नोटिसा
पनवेल : हिवाळ्यामध्ये एमएमआर भागातील हवेची गुणवत्ता खालवली जात असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रदुषण करणाऱ्यांवर पनवेल महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार आतापर्यंत प्रदुषणास कारणीभूत ठरत असलेल्या सुमारे १६४ बांधकाम विकासकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच बेकरी आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना महापालिकेच्या वतीने नोटीसा देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात वाढते प्रदुषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या मागर्दर्शक सुचनांची अमंलबजावणी विकासकांनी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी संबंधित आस्थापनांनी १५ दिवसात सुधारणा न केल्यास आस्थापना बंद करण्याची कारवाई करण्याबाबत स्पष्ट आदेश आयुक्त चितळे यांनी दिले आहेत. मुंबई महापालिका प्रमाणे पनवेल महापालिका क्षत्रातील बांधकामे थांबविण्यात येणार असल्याच्या कडक सूचनाही विकासकांना देण्यात आल्या आहेत.
हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग आणि कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी होते. त्यासमवेतच थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदुषणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदुषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
१९ सप्टेंबर२०२४ रोजी ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बेकरी आणि तंदुरकरिता पारंपारिक इंधनाऐवजी स्वच्छ इंधन (उदा. एलपीजी/विद्युत) वापरण्यासाठी योजना सादर करण्याचे निर्देश सह-संचालक (हवा प्रदुषण नियंत्रण) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी दिले आहेत.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या मागर्दर्शक सूचनांची आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावाने अंमलबजावणी करण्यात येत आहे. महापालिका प्रभाग क्षेत्रामध्ये सुरु असलेली बांधकामे आणि विकासकामांच्या ठिकाणी मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी संबंधित बिल्डर किंवा विकासक यांच्याद्वारे केली जात आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्यासाठी महापालिका मध्ये हवा प्रदुषण नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग अधिकारी, उपअभियंता, सहाय्यक नगररचनाकार, मुख्य आरोग्य निरीक्षक काम पाहणार आहेत. याचपध्दतीने प्रभाग समिती स्तरीय हवा प्रदुषण नियंत्रण भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. सदर हवा प्रदुषण नियंत्रण समिती भरारी पथकांवर लक्ष ठेवणार आहे. प्रभाग समिती स्तरावरुन प्राप्त होणारे अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणी तपासून हवा प्रदुषण नियंत्रणासाठी समिती आवश्यक उपाय योजना करणार आहे.
या प्रभाग समिती स्तरीय ‘हवा प्रदुषण नियंत्रण भरारी पथक'मध्ये प्रभाग अधीक्षक, पथक प्रमुख, मुख्य आरोग्य निरीक्षक, प्रभाग अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ‘भरारी पथक'च्या माध्यमातून प्रभाग समिती स्तरीय ‘हवा प्रदुषण नियंत्रण पथक'ने चालू बांधकाम, विकासकामांना भेट देवून प्रत्यक्ष तपासणी अहवाल पर्यावरण विभागास सादर करावा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
-मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका.