राहुल कर्डिले यांनी स्वीकारला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार
नवी मुंबई: सिडकोत नियुक्त झालेले सनदी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार पूर्वीचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्याकडून बेलापूर येथील सिडको भवन येथे स्वीकारला.
राहुल कर्डिले हे सन २०१५ च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशाकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. अभियांत्रिकी (इन्स्ट्रूमेन्टेशन) पदवीधर असलेल्या राहुल कर्डिले यांनी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती, सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, सेलू, जि. परभणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद आणि सहआयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई या पदावर काम केले आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत होते.
वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राहुल कर्डिले यांनी तालुका स्तरापर्यंत ई-कार्यालय या उपक्रमाची अंमलबजावणी केली होती. ई-कार्यालय उपक्रमाची तालुका स्तरापर्यंत अंमलबजावणी करणारा वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला होता. सेवादूत उपक्रमांतर्गत ग्रामस्तरीय उद्योजका (व्हीएलई) मार्फत ऑनलाइन प्रक्रिया राबवून नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा पथदर्शी प्रकल्पही त्यांनी राबविला होता.
नागरिकांकरिता ९० हून अधिक सेवा अधिसूचित करणे, ९० सेवांपैकी २७ सेवा या ऑनलाइन आरटीएस पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच वर्धा जिह्यातील ९६ दुष्काळी गावांतील ९० कि.मी. च्या नाल्याचे खोलीकरण व नाल्याच्या काठाने बांबूची लागवड, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न इ. उपक्रम त्यांनी वर्धा येथे राबविले होते.