नववर्षाचे स्वागत शुद्धीत करुया, धुंदीत नको
नवी मुंबई : 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखो लिटर दारु फस्त केली जाते. या दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असल्याने अन्वय व्यसनमुक्ती केंद्र नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि प्रजापिता ब्रह्मा कुमारीस यांच्या वतीने सोमवारी 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सेक्टर-9 मिनी सी-शोअर येथे नववर्षाचे स्वागत शुद्धीत करुया धुंदित नको असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कोपरखैरणेतील आर.एफ.नाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तसेच ब्रम्हा कुमारीजने व्यसनमुक्तीवरील पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच यावेळी व्यसनमुक्ती वरील द्रुकश्राव्य चित्रफिती, पत्रकांचे देखील वाटप करण्यात आले. रस्त्यावरुन आम्ही दारु पीत नाही तुम्ही तर माणसे आहात, असे संदेश फलकाद्वारे प्रसारीत करण्यात आले. यावेळी सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावी व्यसनाच्या वाढत्या प्रमाणाविषयी डॉ अजित मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात खंत व्यक्त केली. या प्रसंगी गॅलेक्सी सरफॅक्टंट्सचे माजी उपाध्यक्ष आदर्श नय्यर, ब्रह्माकुमारीजच्या शुभांगी दीदी, प्रीती दीदी, प्राचार्य रवींद्र पाटील, यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केले. मधुकर वारभुवन यांनी व्यसनमुक्तीवरील खड्या आवाजात दोन गीते सादर केली. प्रा.नयन म्हात्रे यांनी सूत्रसंचालन तर प्रा वृषाली मगदूम यांनी आभार मानले.
या प्रसंगी आर.एफ.नाईक कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे विद्यार्थी, स्त्री मुक्ती संघटना, चेतना फाउंडेशन, कविता डॉट कॉम आणि अंनिसचे अनेक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि या समस्येच्या सोडवणुकी विषयीची आस्था असणारे अनेक नागरिक उपस्थित होते.