उड्डाणपुलाखालील बेघरांमुळे नवी मुंबई शहराला अवकळा?

वाशी : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतामध्ये देशात तिसरा क्रमांक आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, नवी मुंबई शहरातील उड्डाणपुलाखाली बेघरांनी संसार थाटल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी उड्डाणपूल स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला जात असताना, बेघरांच्या तांड्यांनी नवी मुंबई परिसराला अवकळा आली आहे.

स्वच्छ शहर म्हणून देशात नाव कमावलेल्या नवी मुंबई शहरातील उद्याने, रस्ते, मोकळे भूखंड, रस्त्यांलगतच्या जागाही स्वच्छ आणि सुशोभित करण्यात आल्या आहेत. याशिवाय सायन-पनवेल महामार्ग बंदिस्त तर सानपाडा मधील उड्डाणपूल खालील जागा सुशोभित करुन त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे काम तात्कालिक महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात पार पडले आहे. मात्र, सध्या नवी मुंबई शहरातील उड्डाणपुलांखाली पुन्हा एकदा बेघर नागरिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे स्टेशन बाहेरील उड्डाणपूल खालील मोकळ्या जागेचा ताबा बेघरांच्या तांड्यानी घेतला आहे.  मागील काही महिन्यांपासून याठिकाणी बेघरांच्या तांड्यानी आपला घरोबा वसविला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरुन येता-जाता हमखास अनेकांच्या नजरेस उड्डाणपूल खालील गलिच्छ चित्र पडते. याआधी बेघरांचा तांडा कोपरखैरणे स्टेशन बाहेर पथारी मांडून होता. त्यांच्यावर महापालिका द्वारे अतिक्रमण हटाव कारवाई होताच त्यांनी आपला घरोबा कोपरखैरणे स्टेशन बाहेरील उड्डाणपूल खालील जागेत मांडला आहे. नागरिकांना चालण्यासाठी असणाऱ्या या जागेत बेघरांनी संसार थाटल्याने नागरिकांना रस्त्यातून वाट काढत रस्ता पार करावा लागतो. उड्डाणपूल खाली असणाऱ्या जागेत भंगार साहित्य, चुली, पाण्याची भांडी, कपडे आदीची भाऊगर्दी झाल्याचे चित्र दिसते. रस्त्याच्या एका बाजूला रिलायन्स तर दुसऱ्या बाजूला कोपरखैरणे भुयारी मार्ग असल्याने नागरिकांची कायम ये-जा सुरु असते. बेघरांमुळे कोपरखैरणे स्टेशन बाहेरील उड्डाणपूल खालील जागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तेथेच सर्व विधी उरकले जात असल्याने परिसर गलिच्छ होऊन दुर्गंधी येऊ लागली आहे. मात्र, याकडे हाकेच्या अंतरावर असणारे नवी मुंबई महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयाकडून दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबई महापालिका तर्फे बेघरांनी बेकायदा संसार थाटलेल्या ठिकाणांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. टप्प्या टप्प्याने  उड्डाणपूल खालील जागेत राहणाऱ्या बेघरांवर कारवाई करुन त्यांची संख्या कमी केली जाणार आहे. यापूर्वीही कोपरखैरणे स्टेशन बाहेर राहणाऱ्या बेघरांवर कारवाई करण्यात आली होती. - सुनील कोठाले, सहाय्यक आयुक्त - कोपरखैरणे विभाग कार्यालय, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नववर्षाचे स्वागत शुद्धीत करुया, धुंदीत नको