परदेशी नागरिकांविरुध्द नवी मुंबईत तीव्र मोहीम
हद्दपार परदेशी नागरिकांच्या बायोमेट्रिक नोंदीस सुरुवात
नवी मुंबई : नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन आणि बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी पोलिसांनी या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवून ६५३ परदेशी नागरिकांची धरपकड केली आहे. यात ६३ आफ्रिकन नागरिक आणि १४ बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे. या सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या मुळ देशात हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, हद्दपार केलेले परदेशी नागरिक पुन्हा भारतात येऊ नयेत यासाठी पोलिसांनी त्यांची बायोमेट्रीक्स नोंद करण्यास तसेच त्यांची माहिती मुंबईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (एफआरआरओ) पाठवण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत उलवे, खारघर, कोपरखैरणे, कामोठे आणि अन्य भागात आफ्रिकन तसेच बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या रहात असल्याचे तसेच त्यातील अनेक परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवायात आणि अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचे पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायात दिसून आले आहे. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या निर्देशानुसार परदेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबईत राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची नियमित तपासणी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे जे परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवायात अथवा अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतले आहेत, अशा परदेशी नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्यात येत आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी या वर्षामध्ये विविध प्रकारच्या अनेक मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमेत अनेक परदेशी नागरिकांच्या व्हिसाची आणि पासपोर्टची मुदत संपली असताना देखील ते वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच पासपोर्ट व्हिसा शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन अनेक बांग्लादेशी नागरिक नवी मुंबईत वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे.
तसेच काही घरमालक अधिक पैशांच्या लोभापायी आपल्या घरात बेकायदेशीररित्या परदेशी नागरिकांना भाडोत्री म्हणून ठेवून त्यांची माहिती लपवून ठेवत असल्याचे देखील आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या वर्षामध्ये नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात छापेमारी करुन ६३९ आफ्रिकन आणि १३५ बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. त्यापैकी ६३९ आफ्रिकन आणि १४ बांग्लादेशी नागरिक अशा एवूÀण ६५३ परदेशी नागरिकांना भारतातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरीत बांग्लादेशी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी हद्दपार करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांची गत महिन्यांपासून बायोमेट्रीक्स नोंद करण्यास सुरुवात केली आहे. तसेच परदेशी नागरिकांवरील कारवाई अधिक कठोर करण्यासाठी, ५६९ परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यापैकी ४९६ परदेशी नागरिकांना आतापर्यंत काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
परदेशी नागरिकांविरोधातील कारवाई...
नवी मुंबई पोलिसांकडून या महिन्यात एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून, ७० आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६ आफ्रिकन नागरिकांकडून १३ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने आणि स्थानिक पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यात घुसखोर बांग्लादेशी नागरिकांविरुध्द २५ गुन्हे दाखल करुन अनेक बांग्लादेशी नागरिकांची धरपकड केली आहे.
परदेशी नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन...
नागरिकांनी त्यांच्या भागात राहाणाऱ्या किंवा काम करणाऱ्या बांग्लादेशी किंवा आफ्रिकन नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तळोजा, खारघर, उलवे, वाशी आणि कोपरखैरणे यासारख्या भागात आफ्रिकन आणि बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बेकायदेशीर स्थलांतरितांचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्ट्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांचे नियमितपणे मॅपिंग करुन त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे.