वाशी मधील महालक्ष्मी सरस प्रदर्शन मध्ये २० कोटींची उलाढाल
नवी मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबई शहरातील वाशी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२४' प्रदर्शनाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. उमेद अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या क्रियशिलतेला चालना देण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या राज्यस्तरीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
वाशी रेल्वे स्टेशन जवळील सिडको प्रदर्शन केंद्रात १४ ते २५ डिसेंबर या कालावधीत महालक्ष्मी सरस या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये हातमागावरील वस्त्र, साडया, हस्तकला, शिल्पकला, मसाले, घरगुती उत्पादने आणि महाराष्ट्रातील खास पारंपरिक वस्तू यांचा समावेश होता. याशिवाय, महाराष्ट्राच्या अस्सल खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी ७० स्टॉल्स असलेले एक भव्य फूड कोर्ट या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. या प्रदर्शनाला नवी मुंबई आणि मुंबई शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने अनेक स्टॉल्स वरील सर्व उत्पादने विकली गेली. त्यामुळे या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाली. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनामुळे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या अनेक स्टॉलधारक महिलांना टनात ऑर्डर मिळाल्याचे ‘उमेद'चे सीईओ रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा समृध्द अनुभव
महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्रातील समृध्द खाद्य संस्कृतीचा अनुभव पाहायला मिळाला. यात कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण थाळी, उकडीचे मोदक, माणदेशी मांडे, विदर्भातील खर्डा चिकन, मालवणी मच्छी फ्राय, शाही चिकन बिर्याणी यासारखे पारंपरिक पदार्थ विशेष आकर्षण ठरले. याशिवाय अस्सल गोडव्याचे पदार्थ, शुध्द मसाले, लोणची, चटणी आणि हुरडा यासारख्या पदार्थांमुळे प्रदर्शनात वेगळाच उत्साह होता.
ग्रामीण महाराष्ट्रातील हस्तकला देखील या प्रदर्शनात पाहायला मिळाली. बांबू कलाकृती, हातमागावर तयार केलेले कपडे, मातीच्या वस्तू, गोंड चित्रे, नक्षीदार वाद्ये, भिंतीवर तयार केलेली कलाकुसर, वारली चित्रे, टसर सिल्क, मिलेट शेवय्या या वस्तू प्रदर्शनाची शोभा वाढवत होते.
उमेद मार्टः ई-कॉमर्स पलॅटफॉर्म
ग्रामीण महिलांचे उत्पादन सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी उमेद अभियानाने ‘उमेद मार्ट ई-कॉमर्स पलॅटफॉर्म' सुरु केले आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. या पोर्टलवर ग्रामिण महिला उद्योजकांच्या उत्पादनाची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या या उत्पादनांची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे, असे ‘उमेद'चे अवर सचिव धनवंत माळी यांनी सांगितले.
ग्रामीण महिला सशक्तीकरणासाठी अभियान
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) २०११ पासून कार्यरत असून, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टया स्वयंपूर्ण बनवण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये स्वयं सहाय्यता समूहांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण महिलांना उद्योजक म्हणून ओळख मिळवण्याची एक उत्तम संधी प्राप्त झाली आहे. आतापर्यंत ६ लाख ४८ हजार स्वयंसहाय्यता समूह, ३२ हजार ९४० ग्रामसंघ स्थापन झाले आहेत. तसेच १,९५७ प्रभाग संघ, ४५0 पेक्षा जास्त महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि १० हजार ५०० पेक्षा जास्त उत्पादक गट स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे ६५ लाख महिलांना या उपक्रमाद्वारे आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. अनेक राष्ट्रीय बँकांनी ग्रामीण महिलांसाठी कमी व्याज दराने कर्ज देण्यास सुरुवात केली असून, यावर्षी ८,८६६ कोटींचे कर्ज ग्रामीण महिला उद्योजकांसाठी उपलब्ध केले गेले आहे.