वाहतूक नियमांचे उल्लंघन; ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित

तुर्भे :  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई वाशी वाहतूक नियंत्रण शाखा तर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार वाशी वाहतूक नियंत्रण शाखा द्वारे १ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ७८६ वाहनचालकांवर ५० लाख ४३ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. त्यापैकी ४ लाख २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दाऊ पिवून वाहन चालवणाऱ्या, कर्णकर्कश सायलेन्सर लावून वाहन चालविणाऱ्या ६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच १२७ वाहन चालकांविरोधात न्यायालयात खटले दाखल करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. युट्यूबवर प्रसिध्दी करीता आपल्या खाजगी वाहनांवर धोकादायक स्टंट करणाऱ्या युट्यूबरवर देखील  कारवाई करुन त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. यापुढे देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई चालू ठेवण्यात येणार असून, कॉलेज विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाटयाद्वारे वाहन चालक, स्कूल बस, रिक्षा संघटना, वाहतूक संघटना यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे दृष्टीने प्रबोधन करण्यात आले आहे. याशिवाय माहितीपर कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सोशल मिडीयावर प्रसिध्दी मिळवण्याकरीता धोकादायक स्टंट करु नये, याबाबत तरुणांमध्ये जागृती करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी मधील महालक्ष्मी सरस प्रदर्शन मध्ये २० कोटींची उलाढाल