एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवाराचा पुनर्विकास पुन्हा रखडणार?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा बाजार मधील सर्व इमारतींचा  पुनर्विकास होणार आहे. मात्र, त्याबाबत अजून अंतिम निर्णय न झाल्याने कांदा-बटाटा बाजार मधील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्यात आली नाही. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजार मधील व्यापारी आजही धोकादायक गाळ्यातूनच व्यापार करीत आहेत. मात्र, येथील गाळे जीर्ण झाल्याने त्यांचे प्लास्टर पडण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे कांदा-बटाटा बाजारातील सर्व गाळ्यांना लोखंडी खांबाचा आधार देऊन गाळे दुरुस्ती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, बाजार समिती प्रशासनाने गाळे दुरुस्तीचे  काम हाती घेतल्याने कांदा- बटाटा बाजाराचा पुनर्विकास पुन्हा रखडणार का?, अशी चर्चा आता कांदा-बटाटा बाजार आवारात सुरु झाली आहे.

जुन्या मुंबईतील बाजार समितीतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शासनाने जुन्या मुंबईतील घाऊक बाजार नवी मुंबई मधील तुर्भे येथे टप्याटप्याने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्वात प्रथम सन १९८१ मध्ये कांदा-बटाटा मार्केट स्थलांतराचा निर्णय झाला. सन १९७९-८० या दरम्यान ‘सिडको'ने तुर्भे येथील ७.९२ हेक्टर (७९१७८.७३ चौरस मिटर) भूखंडावर कांदा-बटाटा बाजार आवाराचे बांधकाम केले. परंतु, निकृष्ट बांधकाम दर्जामुळे कांदा-बटाटा मार्केट मधील गाळ्यांचे बांधकाम पडू लागले. २०ते २५ वर्षात बाजार समिती धोकादायक स्थितीत झाली असून, सन २००३ पासून नवी मुंबई महापालिकेच्या  धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. मागील दोन वर्षांपासून कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, निवडणुकीमुळे या चर्चांना, बैठकींना ब्रेक लागला होता. एपीएमसी सचिवांच्या दालनातील छताचे प्लास्टर कोसळल्याने पुन्हा कांदा-बटाटा बाजार पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानिमित्ताने एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात पुन्हा पुनर्विकासबाबत बैठकांवर बैठका घेऊन निर्णय अंतिम टप्प्यापर्यंत आला होता.

मात्र, आता कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास विषय मावळल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच  एपीएमसी प्रशासनाने आता एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील दिवसेंदिवस जीर्ण होत चाललेल्या गाळ्यांच्या पुढील आणि मागच्या पिलरला लोखंडी खांबाचा आधार देण्याचे काम सुरु केले आहे. कांदा-बटाटा बाजारात एकूण २४०गाळे असून, या सर्व गाळ्यांना टेकू देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याकरिता अंदाजित ३५ ते ४० लाख खर्च करण्यात आलेला आहे.

-------------------------------------
पुनर्विकासाला पुन्हा खो?
सन २००५ पासून एपीएमसी कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहे.  मात्र, आजमितीला कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाची एकही वीट रचण्यात प्रशासन तसेच शासनाला यश आले नाही. त्यावेळी निधी अभावी तसेच व्यापाऱ्यांच्या मागण्यांमुळे कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडला होता. मागील दोन वर्षांपासून कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्बांधणीला गती देण्याचे काम सुरु होते. सप्टेंबरमध्ये सदर निर्णय अंतिम टप्प्यात आला असून आता तांत्रिक , कायदेशीरबाबी सुरु आहेत. त्यानंतर संबधित शासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र, कांदा-बटाटा बाजारातील सर्व गाळ्यांना लोखंडी अँगल टाकून टेकूचा आधार दिला जात असल्याने कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाला पुन्हा खो बसणार का?, अशी चर्चा बाजार घटकांमध्ये सुरु आहे.

--------------------------------------
एपीएमसी कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास विषय सुरु आहे. मात्र, सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून कांदा-बटाटा बाजारातील गाळ्यांना लोखंडी अँगल बसविण्यात आले आहेत. - सुरेश मोहाडे, कार्यकारी अभियंता -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक नियमांचे उल्लंघन; ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित