४०४ ग्रामपंचायतींमध्ये पेसा दिन साजरा
ठाणे : जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ४०४ ग्रामपंचायतीमध्ये २४ डिसेंबर रोजी ‘पेसा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पेसा कायद्याच्या निर्मितीला २४ डिसेंबर २०२४ रोजी २८ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबधित ग्रामपंचायतींमध्ये विविध आदिवासी रुढी, प्रथा परंपराचे सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करुन पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, गावांतील ग्रामसभा कोष समिती सदस्य आणि ग्रामस्थ तसेच शासकीय विभागांचे गावस्तरीय अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. तसेच पेसा कायदा, वन हक्क कायदा, पेसा क्षेत्रातील आणि आदिवासी बांधवांसाठीच्या विविध योजना-उपजिवीका औषध वनस्पती, बांबु लागवड आणि इतर महत्वपूर्ण पुस्तकांचे स्टॉल ‘पंचायत समिती मुरबाड'च्या वतीने लावण्यात आला होता.
शिवार फेरी, आरोग्य शिबीर, कायदा प्रशिक्षण तसेच ग्रामपंचायतींमध्ये कायद्याबाबत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या ग्रामस्थ, ग्रामसभा कोष समिती सदस्य आणि पेसा ग्रामसभा मोबिलायझर यांना प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी कायद्याच्या तरतुदींचे सामुहिक वाचन करण्यात आले. कायद्याशी संबंधित सर्व विभागांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.