अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट मोडीत
वर्षभरामध्ये ६५४ कारवाया, ३३.२७ कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात नशामुक्त नवी मुंबई या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करुन शहरात सुरु असलेल्या अंमली पदार्थाच्या विक्रीचे रॅकेट मोडीत काढले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीला चांगलाच आळा बसला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमंली पदार्थ विरोधी कक्षाने आणि स्थानिक पोलिसांनी या वर्षांभरामध्ये अमली पदार्थाशी संबंधित ६५४ कारवाया करुन तब्बल ३३ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि त्याचे सेवन करणाऱ्या एकूण ९३९ आरोपीची धरपकड केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षातील अंमली पदार्था विरोधात झालेल्या कारवाईत १७९ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे तसेच या अंमली पदार्थाच्या आहारी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी आणि तरुणवर्ग जात असल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यास पुढाकार घेतला आहे. तसेच नवी मुंबई शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी या वर्षभरामध्ये शहरातील शाळा, कॉलेज, मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गार्डन आदि ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून विविध ठिकाणी छापेमारी करुन अंमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अंमली पदार्थाच्या एनडीपीएस कलमांतर्गत एकूण ६५४ कारवाया केल्या आहेत. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि बाळगणारे अशा एकूण ९३९ आरोपींची धरपकड केली आहे.
सदर कारवाईत तब्बल ३३ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ७५ कारवाया करुन एकूण २५ कोटी १३ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच २०१ आरोपींना अटक केली आहे. यात ५८ विदेशी नागरिकांचा (आफ्रिकन नागरिक) समावेश आहे. उर्वरित कारवाया स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २०२३ मध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्था विरोधात एकूण ४७५ कारवाया करून सुमारे २३ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तसेच ८११ आरोपींना अटक केली होती. गतवर्षीच्या तुलतनेत या वर्षाध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाशी संबंधित कारवायांमध्ये वाढ केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांवरील कारवाई...
शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत येणाऱ्या आफ्रिकन देशातील अनेक परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवायात तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचे आढळून आल्याने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून ५८ विदेशी नागरिकांची (आफ्रिकन नागरिक) धरपकड केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांकडून तब्बल २५ कोटी ७० लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
नशा मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि उपक्रम देखील नियमित राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थासंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडे अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी. सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल.
-संदीप निगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई.