भिवंडी महापालिकेत तंत्र-मंत्र,
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर आयुक्त दालनाबाहेर असलेल्या संरक्षक लोखंडी प्रवेशद्वारावर लोंबकळलेले विधिपूर्वक लावलेले मातीचे मडके, आपल्या सरकारी कार्यालयाच्या दारावर आयुक्तांनी सहीनिशी लावलेले सील, त्या दरवाज्यावर हनुमानाचा फोटो आणि खुद्द आयुक्तांचे अचानक रजेवर जाणे या सर्व गूढतेच्या घटनांनी संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आयुक्त कार्यालय आता प्रशासकीय केंद्रापेक्षा तांत्रिक केंद्रासारखे भासत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
यापूर्वी देखील महापालिकेच्या उद्घाटनानंतर काही दिवसांनी मुख्यालयाच्या तळमजल्यावर तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सांगण्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी होमहवन विधी केले होते. आता पुन्हा एकदा आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गूढ मडक्याने महापालिकेत भानामतीचा प्रकार होत असल्याने चर्चेचे केंद्र बनली आहे.
भिवंडी महापालिकेत रुजू झाल्यापासून आयुक्त अजय वैद्य यांची अनाकलनीय आणि वादग्रस्त कृती, महापालिकेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा यासाठी कुप्रसिध्द असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचा अंधश्रध्दा आणि जादूटोणाचा नवा चेहरा समोर आला आहे. याप्रकरणी ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या पदाधिकाऱ्यानी पोलीस ठाण्यात आणि राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. भिवंडी महापालिका आयुक्त अजय विलास वैद्य यांच्या कार्यालयीन सहकारी कर्मचाऱ्यांनी जादूटोणा, तांत्रिक मांत्रिक यांचे काम करणाऱ्या तथाकथित बाबा (नाव माहीत नाही) याने सार्वजनिक मालमत्ता असलेल्या महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन कायदा प्रतिबंधीत असे कर्मकांड केलेले आहेत. या कर्मकांडातून बाह्य भागातील जाळीवर उलटे मडक्याचे झाकण लटकविले आहे. तसेच कर्मकांड केलेले इतर साहित्य आयुक्तांच्या टेबल आणि खुर्ची खाली तसेच ॅान्टी चेंबरमध्ये असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
आयुक्त कार्यालयाचे सीसीटिव्ही नियत्रंण आयुवत अजय वैद्य त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मागील ६ महिन्याचे सीसीटिव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेऊन आयुक्त वैद्य, लिपीक सुदाम जाधव, जादूटोणा तांत्रिक मांत्रिक विद्या करणारा तथाकथित बाबा यांच्याविरुध्द महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यान्वये तसेच इतर संबंधीत कायद्याद्वारे गुन्हा नोंद होऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार ‘शिवसेना उबाठा'चे शहर सचिव गोकुळ कदम यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात केली आहे.
दरम्यान, सध्या महापालिका आयुक्त अजय वैद्य ३ जानेवारीपर्यंत दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे सदर कर्मकांड महापालिका कार्यालयात आणि शहरात चर्चेचा विषय बनला असून काही जागरुक नागरिक देखील माहिती मिळताच खात्री करण्यासाठी महापालिकेत येत आहेत.