पनवेल दिवाणी न्यायालयातील लिपीकाचा कारनामा
पनवेल : पनवेल येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत असलेल्या दीपक मोहन फड (३२) या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या करुन त्यावर न्यायालयाचे शिक्के मारत बनावट वारस दाखले तयार केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी दीपक फड याला अटक करुन त्याची चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी फड याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करुन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये पनवेल येथील दिवाणी न्यायालयात एका वकिलाने दिवाणी चौकशी अर्ज क्र.११३/२०२२ मधील आदेशाच्या नक्कलेची सत्यप्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयातील सहायक अधीक्षक प्रविण बांदिवडेकर यांनी नक्कल अर्ज रजिस्टरची पडताळणी केली असता त्याची नोंद नक्कल अर्ज रजिस्टरमध्ये नसल्याचे आढळून आले. सदर प्रकरण मृत नारायणदास छोटेलाल गुप्ता यांच्या मालमता संदर्भात वारस दाखला मिळविण्यासाठी असल्याचे तसेच सदर दिवाणी चौकशी अर्ज प्रकरण ५वे सह-दिवाणी न्यायाधिश क. स्तर, पनवेल यांच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे आढळून आले.
अधिक पडताळणी दरम्यान, सदर नकलेच्या (६५८६/२०२३) अर्जावरील आदेषावर ५वे सह-दिवाणी न्यायाधिश क स्तर, पनवेल बीडकर यांची तसेच सहायक अधिक्षक प्रविण बांदिवडेकर यांच्या बोगस सह्या आणि न्यायालयाचे बनावट शिक्के असल्याचे आढळून आले. त्यानंतर या बनावट नक्कलेच्या आदेषावरील अर्ज क्रमांक ११३/२०२२ ची न्यायालयाच्या सीआयएस या संगणकीय प्रणालीमध्ये पडताळणी केली असता त्यातून सदर प्रकरण डिलीट करण्यात आल्याचे आढळून आले. न्यायालयाच्या सही-शिक्क्यांचा वापर करुन बनावट वारस दाखले बनवून देण्यात येत असल्याचे या प्रकरणातून निदर्शनास आल्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्ोऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षक संचिता घरत यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. या तपासात न्यायालयात कार्यरत असलेला लिपीक दीपक फड याने सदर प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी दीपक फड याला अटक करुन त्याला २३ डिसेंबर रोजीन्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
फड विरोधात दुसरा गुन्हा दाखल...
या प्रकरणातील अटक आरोपी दीपक फड याच्या चौकशीत त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये खोटे आण बोगस चलान बनविल्याचे देखील उघडकीस आले आहे. तसेच त्या माध्यमातून त्याने २०१९ पासून चलानच्या लाखो रुपयांचा अपहार करुन शासनाची, वकिलांची तसेच पक्षकारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपक फड याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल केला आहे.
अनेक बनावट वारस दाखले बनविल्याचा संशय...
आरोपी दीपक फड याने ठाणे येथील मृत नारायणदास छोटेलाल गुप्ता यांच्या मालमत्ता संदर्भात बनावट वारस दाखला बनवून दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे त्याने याच पध्दतीने पनवेल दिवाणी न्यायालयातून अनेक बनावट वारस दाखले तयार केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.