बोट दुर्घटनेमुळे जलपर्यटनाला फटका
उरण : नाताळच्या सुट्टीत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटकांची पावले कोकण किनारपट्टीवर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि मुंबई शहर तसेच जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी वळतात. मात्र, नुकतीच १८ डिसेंबर रोजी घारापुरी बेटाकडे प्रवाशी नागरीकांना घेऊन जाणाऱ्या निलकमल या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली. त्यामुळे नाताळच्या सुट्टीत बोट दुर्घटनेचा फटका अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडील जल पर्यटनाला बसला असून सध्या स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात घारापुरी बेट उर्फ लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी (एलिफंटा) बेटांनी आपल्या नावाची ओळख देश-परदेशातील हजारो पर्यटकांच्या हृदयात निर्माण केली आहे. त्यामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटकांची पावले दरदिवशी आप आपल्या कुटुंबासह घारापुरी बेटावर वळतात. याचा फायदा कोकणातील, घारापुरी बेटावरील गोर-गरीब व्यवसायिकांना तसेच बोट चालकांना होत असतो. मात्र, १८ डिसेंबर रोजी मुंबई शहरातून घारापुरी बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या निलकमल या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १४ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या जल पर्यटनाला बसला आहे.
देशाचे महत्वाचे शहर म्हणून मुंबईची ओळख असून मुंबई शहराजवळचे जागतिक किर्तीचे घारापुरी बेट पाहण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील हजारो पर्यटक दरदिवशी येत असतात.
आम्ही नुकतीच बोट दुर्घटनेची बातमी टिव्ही वर पाहिली. तरी पण आम्ही कुटुंब घाबरुन न जाता नाताळाच्या सुट्टीत मुंबई शहर आणि घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी आलो आहोत. परंतु, अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने, बोट चालकांनी खबरदारी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. घारापुरी बेटावरील लेणी आणि येथील निसर्गसौंदर्याचा आनंद वेगळाच अनुभवास मिळत आहे.
-समीर पाटील, ठाणे.
देश-परदेशातील पर्यटक नाताळाच्या सुट्टीत घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने कुटुंबासह येत असतात. मात्र, बोट दुर्घटनेमुळे तेवढ्या प्रमाणात पर्यटक आले नाहीत. त्याचा फटका काही अंशी स्थानिक व्यवसायिकांना बसला असला तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षात निश्चित हजारो पर्यटकांची पावले घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी आणि येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ये-जा करतील. पर्यटकांच्या स्वागतासाठी आज आणि उद्या घारापुरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ एकदिलाने पुढाकार घेतील.
-बळीराम ठाकूर, उपसरपंच-घारापुरी.