नवी मुंबईतील होल्डींग पॉन्डच्या पुनर्जिवीकरणासाठी गतीमान कार्यवाही
नवी मुंबई : पावसाळ्यात ज्या होल्डींग पॉन्ड मुळे नवी मुंबई शहराचे पावसाळी पाण्यापासून संरक्षण होते, अशा होल्डींग पॉन्डची पावसाचे पाणी धारण करण्याची क्षमता इतक्या वर्षात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आणि पाण्यात वाहत आलेल्या खारफुटींचीही वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षात उधाण भरतीची वेळ आणि मोठ्या पर्जन्यवृष्टीची वेळ जुळून आल्यास होल्डींग पॉन्डची पावसाळी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी झाली असल्याने ते पाणी शहराच्या सखल भागात जमा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरिता सदर होल्डींग पॉन्ड गाळ काढून स्वच्छ करणे आणि त्याची पाणी धारण क्षमता वाढविणे असा उपाय असून याकरिता परवानगी मिळावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने विशेषत्वाने पावसाळी कालावधीत समुद्राच्या भरतीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी ‘सिडको'ने नवी मुंबई वसविताना डच पध्दतीने धारण तलावांची (होल्डींग पॉन्ड) रचना केली आहे. बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली विभागांमध्ये ११ होल्डींग पॉन्ड तयार करण्यात आले असून सेक्टर-१२ बेलापूर आणि सेक्टर-८ वाशी येथे होल्डींग पॉन्ड लगत पर्जन्य जलउदंचन केंद्र बांधलेले आहेत. तुर्भे, सेक्टर-२१ एपीएमसी मार्केट जवळही पर्जन्य जलउदंचन केंद्र कार्यरत असून सदर केंद्र परिसरातील सखल भागातील पावसाळी पाणी निचरा होण्याकरिता उपयुक्त आहे.
उर्वरित होल्डींग पॉन्डच्या ठिकाणी पलॅपगेट बसविण्यात आले असून ते खाडीच्या दिशेने उघडतात. ज्यावेळी खाडीत भरतीची वेळ असेल आणि त्याचवेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल तर पलॅपगेट खाडीच्या पाण्यातील दबावामुळे बंद होतात आणि पावसाचे पाणी होल्डींग पॉन्डमध्ये साठून राहते आणि शहरात शिरत नाही. ज्यावेळी ओहोटी सुरु होते, तेव्हा होल्डींग पॉन्डमध्ये साठलेल्या पावसाळी पाण्याच्या दबावामुळे पलॅपगेट खाडीच्या दिशेने उघडतात, तसेच होल्डींग पॉन्ड मधील साठलेले पावसाळी पाणी खाडीमध्ये वाहून जाते. अतिवृष्टी होत असेल अशावेळी पर्जन्य जलउदंचन केंद्रामधील पंपाद्वारे पावसाचे पाणी उचलून खाडीमध्ये सोडण्यात येते.
यावर्षीही पावसाळी कालावधीत २१ जुलै २०२४ रोजी दुपारी अतिवृष्टी आणि उधाण भरती यांचा कालावधी जुळून आल्याने शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विविध ठिकाणांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करीत आपत्कालीन मदतकार्याला गती दिली. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच आयुक्त शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची स्थलदर्शक पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधत पाणी साचण्याची कारणमिमांसा जाणून घेतली.
त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ‘नमुंमपा पर्यावरण विभाग'मार्फत आयआयटी मधील तज्ञांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या तज्ञांनीही पाणी साचलेल्या ठिकाणांची आणि त्या परिसरातील नाले आणि होल्डींग पॉन्डची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीमध्ये आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने होल्डींग पाँड स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन आणि ते तातडीने करण्याची आवश्यकता बघून महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार आयआयटी मुंबईचे तज्ञ प्रा. व्ही. ज्योती प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील तज्ञ सल्लागारांची विशेष समिती १६ ऑगस्ट २०२४ रोजी गठीत करण्यात आली. यामध्ये नवी मुंबई शहर वसविणाऱ्या ‘सिडको'च्या तज्ञ अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला. नवी मुंबई शहरातील होल्डींग पॉन्डची पाणी धारण क्षमता पूर्ववत करण्याकरिता मार्ग काढण्यासाठी या सल्लागार समितीच्या तीन बैठका आयुक्त डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या असून या कामाला गती देण्यात येत आहे.
दरम्यान, होल्डींग पॉन्डची गाळ काढून स्वच्छता करणे अशी बाब उच्च न्यायालय, मुंबई यांच्या पटलावर असून आयआयटी मुंबई आणि सलीम अली पक्षी विज्ञान-प्रकृती विज्ञान केंद्र यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी सदर काम तांत्रिक प्रकारचे विशिष्ट स्वरुपाचे असल्याने तसेच होल्डींग पॉन्डची साफसफाई आणि पुनरुत्थान करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करावयाची असल्याने यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही जलद करुन घेण्याकडे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून शहर अभियंता विभागामार्फत कालबध्द कार्यवाही करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबईचे सुरक्षा कवच मानले जाणारे होल्डींग पाँड सागरी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता स्वच्छ व्हावेत अणि नवी मुंबईकर नागरिकांना पावसाळी काळात अतिवृष्टीच्या वेळी होणारा त्रास होऊ नये याकरिता महापालिकेच्या वतीने जलद पावले उचलण्यात येत आहेत.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.