गतिमान सुविधा पूर्ततेसाठी नमुंमपा प्रयत्नशील
नवी मुंबई : स्वच्छता नवी मुंबई शहरासाठी सर्वाधिक प्राधान्याची बाब असून शहरातील जो परिसर नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत नाहीत; मात्र त्याचा शहर स्वच्छतेवर पर्यायाने स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम होतो, अशा सायन-पनवेल महामार्ग, रेल्वे स्टेशन परिसर, एपीएमसी मार्केट आदि विविध भागांतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सदर भाग नियमित स्वच्छ असणे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब असून याविषयी संबंधित प्राधिकरणांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ठोस कार्यवाही करण्याचे आणि याविषयी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले.
या बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणाली द्वारे प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित वेळेत होत असल्याबाबत प्रत्येक विभागप्रमुखाने खातरजमा करुन घ्यावी. प्रत्येक आठवड्यात अतिरिक्त आयुक्तांमार्फत त्याचा आढावा घेण्यात यावा. महापालिकेच्या विनावापर असलेली मार्केट, समाजमंदिरे आणि इतर सेवा इमारती वापरात आणण्याच्या दृष्टीने गतीमान पावले उचलावीत. त्याचा कालबध्द कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.
यापुढील काळात उद्यानांची कामे अभिनव संकल्पना राबवून करावीत. पर्यटन स्थळ म्हणून त्यांचा विकास होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. उद्यांनामध्ये कंपोस्टींग व्यवस्था, शौचालय व्यवस्था आणि पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी कुलर व्यवस्था उपलब्धा करुन देण्यावर भर द्यावा. प्रदुषण प्रतिबंधाच्या नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावी. तसेच नवी मुंबई शहराचा आर्थिक नियोजन आराखडा तयार करावा आणि पर्यावरण कृती आराखडा तयार करावा, असेही निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस कृती करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची सर्व माहिती शासन पोर्टलवर संग्रहित करण्याच्या कामाला गती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करुन घ्यावा. त्यासोबतच विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती, त्याचे छंद, त्याचा कल, त्याचे व्यक्तीमत्व याबाबत मूल्यमापन होईल अशाप्रकारे डिजीटल माहिती उपलब्ध करुन ठेवावी, असे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी सूचित केले.
महापालिकेच्या प्रत्येक विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा आणि अपेक्षित कामांचा सविस्तर आढावा घेताना सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाच्या कामांची उद्दिष्ट्ये, ती पूर्ण करण्याबाबतचे नियोजन सादर करण्यात यावे. नागरिकांना सुलभ रितीने सर्व लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध होण्याबाबतची कार्यवाही १ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देत ई-ऑफिस तसेच इआरपी प्रणालीही १ जानेवारी पासून संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.