पापडीचा तलावालगत गोमांसाचे अवशेष
खारघर : खारघर येथील पापडीचा पाडा गावालगत असलेल्या गणेश विसर्जनघाटालगत रात्री गो हत्या करुन अवशेष तलाव परिसरात फेकून पसार झालेल्या व्यक्तीच्या विरोधात गावातील ‘सोमेश्वर मंदिर ट्रस्ट'चे अध्यक्ष अभिमन्यू गायकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर ‘भाजपा'च्या कार्यकर्त्यांनी गणेश घाटावर आंदोलन करुन परिसरात सुरु असलेले अनधिकृत कत्तलखाने तातडीने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खारघर, सेक्टर-३९ पापडीचा पाडा गावालगत गणेशघाट आहे. अज्ञात व्यक्तीने १९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गणेश घाट लगत गोवंश जनावराची कत्तल करुन त्याचे कातडे आणि शिंगे एका गोणीत भरुन तलावाची पायरी आणि बाजुच्या नाल्यात फेकून पलायन केले आहे. सदर माहिती पापडीचा पाडा ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून ग्रामस्थ तसेच ‘सोमेश्वर मंदिर ट्रस्ट'चे अध्यक्ष अभिमन्यू गायकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी पनवेल येथील ‘पशु संवर्धन विभाग'चे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकेश मचडे आणि ‘पनवेल पंचायत समिती'चे पशु संवर्धन अधिकारी डॉ. आनंद मारकवार यांनी गोमांसाच्या अवशेषाचे नमुने तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. तर खारघर पोलिसांकडून सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, २० डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास पापडीचा पाडा गणेश विसर्जन घाट लगत गोवंशाची कत्तल करुन अवशेष तलाव परिससरात फेकण्यात आल्याची माहिती ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त होताच किर्ती नवघरे, विजय पाटील, विनोद घरत, निर्दोष केणी, ब्रिजेश पटेल यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांनी तलाव परिसरात आंदोलन केले. तसेच तळोजा परिसरात सुरु असलेले अनधिकृत कत्तलखाने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील अधिवेशनात आठवडी बाजार तसेच हातगाड्यांंवर व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी नागरिक असल्याच्या मुद्दा उपस्थित केल्यामुळे काही माथेफिरुंनी सदर प्रकार केला असावा, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. तर ‘भाजपा'कडून बेकायदेशीर कत्तलखाना बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहे.
पापडीचा पाडा येथील गणेश घाटावर गणेश तसेच देवीचे विसर्जन केले जाते. या शिवाय या ठिकाणी छठपुजा केली जाते. ज्या व्यक्तींनी सदरचे कृत्य केले आहे, त्यांचा शोध पोलिसांनी घेवून त्यांच्यावर कारवाई न केल्यास ‘भाजपा'कडून आंदोलन केले जाईल.
-विनोद घरत, उपाध्यक्ष-भाजपा, खारघर.