एपीएमसी मधील अतिक्रमणाविरोधात नागरिक रस्त्यावर
वाशी : सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या गैरकृत्यांना आळा घालून सर्व सामान्य जनतेला दिलासा देणे प्रशासनाचे काम असते. मात्र, एपीएमसी परिसरात सुरु असलेल्या अवैध प्रकाराला प्रशासन पाठिशी घालून येथील सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात घालत आहे. याबाबत वारंवार मागणी करुन देखील कुठलीच कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली आहे, असा आरोप ‘नवी मुंबई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके यांनी केला आहे.
२४ डिसेंबर रोजी सकाळी वाशी, सेक्टर-२६ येथील नागरिकांनी संकेत डोके यांच्या नेतृत्वात पुनीत कॉर्नर सोसायटी समोरील नाका येथे बहुसंख्येने उपस्थित राहून नवी मुंबई महापालिका आणि सिडको विरोधात निषेध आंदोलन केले आहे. सेक्टर-१९ एफ येथील अनधिकृत झोपडपट्टी, व्यावसायिक गाळे, गॅरेजेस्, अवजड वाहनतळ यांवर कारवाई करुन हटवण्यात यावे, अशी मागणी आहे. सदर अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चोरी, लुटमार, नशाखोरी, भूमाफियागिरी आणि अंमली पदार्थ विक्री सारखे प्रकार घडत आहेत. यांवर पोलीस प्रशासन सतत कारवाई करत असून याने सदरचा प्रश्न मार्गी लागत नसून यावर उपाययोजना म्हणून केवळ येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडकोकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.
यानंतरही कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत संकेत डोके यांच्या नेतृत्वात वाशी, सेक्टर-२६ पुनीत कॉर्नर येथे जन आंदोलन छेडले. सदर आंदोलनाची दखल घेत अनधिकृत झोपडपट्टी, व्यवसायिक गाळे, गॅरेजेस यावर पुढील १५ दिवसात कारवाई न केल्यास महापालिका आयुक्त यांच्या दालनात पुढील जनआंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला.
आंदोलन सुरु असताना वनमंत्र्यांचा ताफा अचानक थांबला...
वाशी, सेक्टर-२६ मधील नागरिकांनी झोपडपट्टी विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. सदर आंदोलन सुरू असताना तेथूून स्थानिक आमदार तथा वनमंत्री गणेश नाईक यांचा ताफा जात असताना आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गणेश नाईक यांनी ताफा थांबवून आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांशी चर्चा करतानाच पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन नाईक रवाना झाले.