खारघर खाडीत देशी-विदेशी पक्षांचे आगमन

खारघर : थंडीची चाहूल लागताच निसर्गाचे वरदान लाभलेल्या खारघर खाडीत देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल पहावयास मिळत असून पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत.

खारघर, सेक्टर-८, १०, १६, १७ मधील वास्तुविहार तसेच रांजणपाडा आणि मुर्बी गावाच्या मागील बाजुस खाडी आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी विविध रंगी, आकर्षक पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. त्यामुळे रंगीबेरंगी पक्ष्यांची छबी टिपण्यासाठी पक्षीप्रेमींमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. खाडीकिनाऱ्यावरील पाणथळ पक्ष्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. थंडीची चाहुल सुरु होताच पक्ष्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.

रशिया आणि मध्य आशिया मधील स्थलांतरीत पक्ष्यांचे खारघरमध्ये मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. आफ्रिका देशातील रोहित, सारस बगळे, रेड बुलबुल, बी इटर, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, जांभळा हेरॉन मार्श हॅरिअर चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे, दुर्मिळ ब्लॅक टेलेड गॉडविटस्‌, कर्ल्यू सँडपायपर्स या पक्षांचा समावेश असल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.

खारघरला निसर्गाने मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, त्याकडे सिडको, पनवेल महापालिका आणि वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे डेब्रीज माफिया मोठ्या प्रमाणात डेब्रीजचा भराव करीत आहेत. तर काहींनी शेड उभारले असून शेड पर्यंत चारचाकी वाहन जावे यासाठी डेब्रीजचा भराव करुन रस्ता तयार करण्यात आला आहे.

खारघर खाडीत मोठ्या संख्येने देशी-विदेशी स्थलांतरीत होत असल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पनवेल महापालिका आणि सिडको यांनी या ठिकाणाचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास केल्यास त्याला पर्यटनप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.
-ए. के. नूल, छायाचित्रकार तथा पक्षीप्रेमी, खारघर.
 
खारघरच्या खाडीकिनाऱ्यावर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. खारघर खाडीचे संवर्धन करुन या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारल्यास ते पर्यटनक्षेत्र म्हणून उदयास येईल. तसेच दुर्मिळ पक्षांची रेलचेलही वाढेल.
-ज्योती नाडकर्णी, पक्षी प्रेमी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मधील अतिक्रमणाविरोधात नागरिक रस्त्यावर