६ हजार धावपटुंनी दिला स्वच्छतेचा संदेश

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आयपीएस  कृष्णप्रकाश यांची ‘हाफ मॅरेथॉन'मध्ये यशस्वी धाव

सीबीडी : स्वच्छतेमधील नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा निर्धार करीत ६ हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन उपक्रम यशस्वी केला.

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन'मध्ये अक्षय पडवळ यांनी २१ कि.मी. अंतर १ तास १३ मिनिट ५४ सेकंद वेळेत पूर्ण करुन पुरुष गटातील विजेतेपद पटकाविले. तर सुजाता माने यांनी २ तास ४ मिनिट १२ सेकंद वेळेत मॅरेथॉन पूर्ण करुन महिला गटाचे विजेतेपद संपादन केले. अशाचप्रकारे १० कि.मी. अंतराच्या रनमध्ये ओंकार बैकर यांनी पुरुष गटात आणि कोमल खांडेकर यांनी महिला गटात विजेतेपद पटकाविले. १८ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५४, ५५ पुढील अशा चार वयोगटांमध्ये पुरुष आणि महिला यांना प्रत्येक गटात ३ पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.

२१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. गटाप्रमाणेच या ‘हाफ मॅरेथॉन'मध्ये १ ते ३ कि.मी.च्या विशेष रन मध्ये १५० हून तृतीयपंथी नागरिक, ५० हून अधिक दिव्यांग, ४० हून अधिक ऑटिझम व्यक्ती, ५० हून अधिक अंध व्यक्ती यांनीही विशेष सहभाग घेतला. याशिवाय अनेक दिव्यांग ५ कि.मी. अंतराच्या रनमध्ये सहभागी झाले. तसेच काही अंध व्यक्तींनी १० आणि २१ कि.मी. अंतराच्या गटात सहभाग घेतला. तर ५०० हून अधिक शालेय विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, ६ हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साही सहभाग घेत ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन'चा उपक्रम ‘निश्चय केला, नंबर पहिला'चा जागर करीत यशस्वी केला.

या ‘हाफ मॅरेथॉन'मधील २१ कि.मी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ‘फोर्स वन'चे प्रमुख कृष्णप्रकाश यांनीही २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. सहा. आयुक्त जयंत जावडेकर यांनी २१ कि.मी. तसेच प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी १० कि.मी. धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. अतिरिवत आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच अनेक विभागप्रमुखांनी तसेच अधिकारी, कर्मचारीवृंदाने ५ कि.मी. गटात यशस्वी सहभाग घेतला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बांग्लादेशी नागरिकांविरोधात धडक कारवाई