अपघातग्रस्त चालकाचे वेतन देण्यास महापालिका सकारात्मक
नवी मुंबई : ‘एनएमएमटी'च्या बस अपघातात जखमी चालकाला उपचारासाठी मदत न करणे व त्यानंतर त्याचे वेतन थांबविणे असे प्रकार नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून होताच महाराष्ट्र कर्मचारी युनियन आणि कामगार नेते रविंद्र सावंत या अपघातग्रस्त चालकाच्या मदतीला धावून गेले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला वेतन देण्याचे मान्य केले आहे.
एनएमएमटी उपक्रमातील आसूडगांव डेपोतील चालक राजकुमार सोनकांबळे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बस मार्ग क्र.५९ वर बस घेऊन जात असताना पनवेल येथील आदई तलावाजवळ चालकाच्या बाजुचा दरवाजा अचानक उघडून झालेल्या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला जबरी मार लागून पाय फॅक्चर झाला आहे. अपघातानंतर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात रहावे लागले. एकतर ऑनड्युटी अपघात झालेला असताना संबंधित चालकाच्या उपचाराची सर्व जबाबदारी महापालिका प्रशासनाने उचलणे आवश्यक होते. परंतु, महापालिका प्रशासनाने उपचाराचा खर्च न उचलल्याने ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने या कर्मचाऱ्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली. उलटपक्षी महापालिका प्रशासनाने त्या कर्मचाऱ्याची औषधोपचाराची जबाबदारी सोडाच; या कर्मचाऱ्याचा उपचार कालावधीतील वेतनही रखडवले. यामुळे प्रशासनाच्या कृती विरोधात ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने महापालिका आयुक्त निवासस्थानासमोर भीक मांगो आंदोलन करण्याची घोषणा केली.
त्यानुसार २१ डिसेंबर रोजी सकाळी महापालिका आयुक्त निवासस्थानासमोर ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'कडून आंदोलन सुरु करण्याच्या हालचाली सुरु होताच प्रशासनाने त्यांना चर्चेसाठी मुख्यालयात बोलाविले. प्रशासन विभागाचे उपायुवत शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमातील आचलकर, जगताप यांच्यासह कामगार नेते रविंद्र सावंत, ‘युनियन'चे नितीन गायकवाड, राजन सुतार, मंगेश गायकवाड यांच्यात चर्चा झाली. यावेळी चर्चेमध्ये संबंधित अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले.
कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. महापालिका प्रशासनाने सदर मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांवर रुग्णालयीन खर्चाचा ताण पडणार नाही. त्यामुळे त्यांना कोणाकडे कर्ज मागण्याची वेळ येणार नाही.
-रविंद्र सावंत, अध्यक्ष-महाराष्ट्र कर्मचारी युनियन.