सायबर भामट्याने लुटलेली २१ लाखांपेक्षा जास्त रक्कम तक्रारदाराला परत
ऐरोली : ऐरोली येथील रामकृष्ण म्हात्रे या ज्येष्ठ नागरिकाचे लाखो रुपये लुटणाऱ्या एका सायबर भामट्याकडून त्याने लुटलेल्या रवकमपैकी २१ लाखांपेक्षा जास्त रक्कम परत मिळविण्यात रबाळे पोलीस ठाणे मधील सायबर पोलीस पथकाला यश आले आहे.रबाळे पोलीस ठाणे मधील सायबर पथकातील पोलिसांनी आपले ज्ञान पणाला लावत एकवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण म्हात्रे यांना परत मिळवून दिल्याने रबाळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऐरोली मधील ग्रीन वर्ल्ड सोसायटी मध्ये ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण नारायण म्हात्रे (वय-७२) राहतात. रामकृष्ण म्हात्रे यांना एका सायबर भामट्याने ऑनलाईन कॉल करुन आणि फसवून त्यांच्याकडून ३६ लाख रुपये १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लुटले होते. याबाबत रामकृष्ण म्हात्रे यांनी रबाळे पोलीस ठाणे मधील सायबर पोलीस पथकाला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर ‘रबाळे पोलीस ठाणे'चे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पावणे, महिला पोलीस शिपाई प्रिया दुबे, पोलीस शिपाई विकास राळे यांनी त्वरित कार्यवाही करुन तक्रारदार रामकृष्ण म्हात्रे यांचे २१ लाख ५० हजार रुपये शोधून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्वरित मदत करुन परत मिळवून दिले आहेत. त्याबद्दल रामकृष्ण म्हात्रे यांनी रबाळे पोलीस ठाणे मध्ये १९ डिसेंबर रोजी त्यांना मोलाची मदत करुन २१ लाख ५० हजार रुपये परत मिळवून देणारे महिला पोलीस शिपाई प्रिया दुबे आणि पोलीस शिपाई विकास राळे यांचे आभार व्यक्त करुन तसेच मिठाई देऊन तोंड गोड केले.
ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तत्काळ नागरिकांनी पोलीस ठाणे मध्ये संपर्क साधला तर यश येऊ शकते. त्यातले रामकृष्ण म्हात्रे एक उदाहरण आहे.त्यामुळे नागरिकांनी जागृत राहून नवी मुंबई पोलिसांनी आर्थिक फसवणूक न होण्यासाठी वेळोवेळी प्रसिध्द केलेली माहिती आत्मसात करावी. परंतु, दुर्दैवाने ऑनलाईन फसवणुकीची घटना घडली तर पोलिसांशी त्वरीत संपर्क साधावा.- बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - रबाळे पोलीस ठाणे.