उल्हासनगर शहरातील वाहतूक समस्या जटील

उल्हासनगर : शहरातील वाहतूक समस्येवर चर्चा करणेसाठी महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी २० डिसेंबर रोजी आयुवत दालनात महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीस आमदार कुमार आयलानी, ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, वाहतूक शाखाचे सहायक पोलीस आयुक्त विजय पवार, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, कल्याण उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक बालाजी बोंदरवाड तसेच महापालिकेतील सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते आणि चौक येथील अनधिकृत रिक्षा धांब्यांवर कारवाई करणे, रिक्षा थांबे आणि रिक्षांची संख्या निश्चित करणे याकरिता वाहतूक पोलीस, पोलीस आणि महापालिका अधिकारी यांची समिती स्थापन करण्याची कार्यवाही करावी. सदर समितीची बैठक दर आठवड्यास घेवून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यात येईल. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्ज, चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत, असे बैठकीत ठरविण्यात आले.

शहरातील मुख्य रस्त्यांवर पिवळे आणि पांढरे पट्टे मारणे, रस्त्यांवर नो-पार्किंग, पी-१ पी-२चे फलक लावणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ निश्चितीसाठी समितीने पाहणी करावी. यानंतर संयुक्त मोहिम १ जानेवारी २०२५ पासून हाती घेवून यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर बैठकीत शहरात सुरु असणारी रस्त्यांची कामे, भुयारी गटार योजनेची कामे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे, बॅरिकेटींग, सुरक्षा पट्टी लावण्याबाबत कार्यवाही करावी. तशा सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. परिवहन सेवेच्या थांब्यांवर (बस थांबा) उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येणार असून, मॅरेज हॉल, मोठे हॉटेल्स यांचे बाहेर होणाऱ्या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळेस (पीक हवर्स) मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्यात येणार आहेत, असा निर्णय आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडी होणारे रस्ते, चौक (बॉटल नेक पॉईंट) आणि शहरातील अपघातप्रवण क्षेत्राची महापालिकेने यादी तयार केली असून वाहतूक शाखेच्या सल्ल्याने सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात यावी. - विकास ढाकणे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.

शहरातील ५ आदर्श रस्त्यांवरील करावयाची कार्यवाही...
कल्याण-अंबरनाथ रोड ३ कि.मी., डॉल्फीन रोड १ कि.मी., व्ही.टी.सी. रस्ता २ कि.मी., मुरबाड रोड १.६८ कि.मी., श्रीराम चौक ते १७ सेक्शन रस्ता ०.७८ कि.मी. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, दुभाजक बांधणे, लाईटींग करणे, रोड लेन, झेब्रा क्रॉसिंग मार्किंग करणे, वाहतुकीशी निगडीत चिन्हे-माहिती फलक लावणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, वृक्षारोपण करणे, याप्रमाणे आगामी ३ महिन्यात महापालिका कार्यवाही करण्यात येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

किसननगर परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम