जल है तो कल है!
आ. मंदाताई म्हात्रे यांची अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी
नवी मुंबई : भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नवी मुंबईकरांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन पाणी स्त्रोत तयार करण्याची मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात २० डिसेंबर रोजी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
नवी मुंबई शहर विकसित शहर म्हणून नावारुपास आले आहे. नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता मुंबईकरांसाठी भविष्यात उदभ्वणारा अति जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. नवी मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या मालकीचे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर मोरबे धरण असून या धरणातून नवी मुंबईकरांना २४ तास दररोज अंदाजे ४५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्येचे प्रमाण तसेच पंतप्रधान आवास योजना, सिडको निर्मित जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, गांवठाण परिसरात परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे तसेच एमआयडीसी क्षेत्रात वाढती झोपडपट्टी आणि औद्योगिक क्षेत्रातील जागांवर निर्माण होणाऱ्या टोले जंग निवासी इमारती यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी वाढणार आहे. भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मोरबे धरणातील पाणीसाठा आपल्या नवी मुंबईतील नागरिकांना कमी पडण्याची शवयता आहे. त्या अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबई महापालिकेसाठी पाण्याच्या पर्यायी नवीन स्त्रोत शोधण्याबाबत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली आहे.
दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी आणि पर्यायी नवीन पाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबत लक्ष केंद्रित केलेले आहे. रायगड जिल्ह्यातील टाटा पॉवरच्या भिरा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे पाणी मोरबी धरणापर्यंत पाईपलाईन द्वारे आणण्याचे ठरविले तर त्यासाठी भूसंपादन करण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच स्थानिकांच्या सर्व कायदेशीर बाबींचा सोपस्कार पूर्ण करावा लागेल. या सर्व खर्चिक बाबी आहेत. शिवाय भिरा प्रकल्पातील पाणी मोरबे धरणामध्ये साठवण्यासाठी या धरणाची उंची वाढवावी लागेल, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सभागृहात सांगितले.
भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाण्याचे स्त्रोेत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, त्याकरिता नवी मुंबईकरांसाठी पाण्याच्या नवीन पर्यायी स्त्रोतांबाबत शासनाने तातडीची कार्यवाही आणि उपाययोजना करणे गरजेचे आहे. - आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर.