‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन' मध्ये करोडोंची उलाढाल

नवी मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी वाशी रेल्वे स्टेशन जवळील सिडको प्रदर्शन केंद्र मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन'ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल ४ कोटी पेक्षा अधिक रक्कमेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री या प्रदर्शनीत झाली आहे. उमेद अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या क्रियशिलतेला चालना देण्यासाठी आणि महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी या राज्यस्तरीय भव्य ‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या २५ डिसेंबर पर्यंत सुरु राहणाऱ्या या प्रदर्शनीत आणखी ५ कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.  

‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यामध्ये हातमागावरील वस्त्रे , साड्या, हस्तकला, शिल्पकला, मसाले, घरगुती उत्पादने आणि महाराष्ट्रातील खास पारंपरिक वस्तू यांचा समावेश आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील अस्सल खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी ७० स्टॉल्स असलेले एक भव्य फूड कोर्ट या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरत आहे. यासोबतच अनेक व्यापाऱ्यांकडून महिलांना थेट ऑर्डर्स मिळत आहेत. सुट्टीचे दिवस नसतानाही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल येथील नागरिकांची खरेदीसाठी होणारी झुंबड या ‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनमध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहे.  

ग्रामीण महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी                                                                                                                                                                                                                                    ‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शन ग्रामीण महिलांसाठी एक सुवर्णसंधी ठरले आहे. नागरिकांनी आवर्जून भेट देऊन ग्रामीण महिलांच्या सर्जनशीलतेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ‘उमेद अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.  

ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा समृध्द अनुभव
‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्रातील समृध्द खाद्यसंस्कृतीचा अनुभव देखील ग्राहकांना घेता येत आहे. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण थाळी, उकडीचे मोदक, माणदेशी मांडे, विदर्भातील खर्डा चिकन, मालवणी मच्छी फ्राय, शाही चिकन बिर्याणी यासारखे पारंपरिक खाद्यपदार्थ उपस्थितांना आकर्षित करत आहेत. साथीला अस्सल गोडव्याचे पदार्थ, शुध्द मसाले, लोणचे, चटणी आणि हुरडा यासारख्या पदार्थांमुळे प्रदर्शनात वेगळाच उत्साह आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील हस्तकला देखील या प्रदर्शनात पाहायला मिळते. बांबू कलाकृती, हातमागावर तयार केलेले कपडे, मातीच्या वस्तू, गोंड चित्रे, नक्षीदार वाद्ये, भिंतीवर तयार केलेली कलाकुसर, वारली चित्रे, टसर सिल्क, मिलेट शेवय्या या वस्तू ‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाची शोभा वाढवत आहे, अशी माहिती ‘उमेद अभियान'चे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी दिली.  

उमेद मार्टः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म
ग्रामीण महिलांचे उत्पादन सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उमेद अभियान' तर्फे उमेद मार्ट नावाचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे, असे ‘उमेद अभियान'चे अवर सचिव धनवंत माळी यांनी सांगितले.  

दरम्यान, ‘महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादकतेला वाव मिळेल, त्यांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे नमूद करुन, ‘नवी मुंबईकरांनी ‘महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन ‘उमेद अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बोटींग सुविधेच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्या -आयुक्त सौरभ राव