उरण तहसील, इतर शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
उरण : आपल्या विविध कामांकरिता सर्वसामान्य जनतेला शासकीय कार्यालय गाठावे लागते. परंतु, कागदपत्राच्या अजाणतेपणामुळे येथे असलेले दलाल लहान-लहान कामांसाठी या लोकांना लक्ष्य करुन आर्थिक भुर्दंड देतात. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदर सर्व प्रकार माहिती असतानाही अशा दलालांवर अंकुश न ठेवताच अधिकारी-कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात. अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट ठेवण्यामागील काय कारण असावे? असा प्रश्न निर्माण होत असला तरी राज्य सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे मागील वर्षांपासून उरण तहसील कार्यालयात आणि इतर शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
उरण तालुका तिसऱ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येतात. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो. कुठल्या तरी कामासाठी त्यांना दाखला हवा असतो. महसूल विभागात जमिनीच्या केसेस, ७/१२ दुरुस्ती, कुळ कायदा, फेरफार त्रुटी, वारस नोंदी नावे, क्षेत्र बदल, पोटखराब नोंदी,जात पडताळणी करणे, आधारकार्ड, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ यासह इतर शासकीय योजनांसाठी एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटीमध्ये निघतो. याकरिता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपला पैसा आणि वेळ खचर्ुन अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. परंतु, एखादा कागद कमी असलेला अर्ज दलालामार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो, असा अनेक सुज्ञ नागरिकांचा अनुभव आहे.
तहसील कार्यालयाबरोबर दुय्यम निबंधक, महावितरण, कृषि, वन, पंचायत समिती, उरण भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक दिसते. कर्मचारी सापडणार नाही; पण दलाल मात्र संबंधित कार्यालयात आणि तहसिल कार्यालयाजवळ बेकायदेशीर बस्तान बसविलेल्या टपरी ठिकाणी हमखास मिळतो. या कार्यालयात कुठलेही काम दलालाशिवाय झाल्यास नशीबच समजावे लागेल. एवढी या कार्यालयात दलालांची वट आहे. काम कसे करुन घ्यायचे? याचा सल्ला दलालच देतात. परंतु, तो फुकट नसतो, ते सर्वश्रुतच आहे. एकंदरीत आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला शेतकरी, सर्वसामान्य जनता या कार्यालयात आपली विविध कामे घेऊन आल्यानंतर त्यांची अडवणूक होते. अशावेळी आपल्या खिशाला चाट देत नाहकच त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची किड नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथील तहसील कार्यालयाबरोबर इतर शासकीय कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण तहसील कार्यालयात एकच अधिकृत सेतू केंद्र सुविधा आहे. तरीपण अनेकांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने टपऱ्यांद्वारे आपला गोरख धंदा सुरु केला आहे. त्यातील दलालांची शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांसोबत उठबस वाढली आहे. शिवाय त्यांच्यासोबत चहापाणी घेणे, नाश्ता, पार्टी करणे अशी त्यांची दिनचर्याही सुरु झाली आहे. सदर प्रकार दलालांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे शासनाने सदर प्रकार कुठेतरी थांबविणे गरजेचे आहे. - एस. एम. पाटील, शेतकरी-उरण.