तुर्भे विभागातील नाल्याचे काँक्रीटीकरण सुरु
तुर्भे : तुर्भे विभागातील एपीएमसी वाहतूक पोलीस चौकी लगतच्या नाल्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम नवी मुंबई महापालिका मार्फत सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी १७ कोटी ११ लाख रुपये खर्च येणार आहे.
नवी मुंबई शहर समुद्रसपाटी पासून खाली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नवी मुंबई शहरात घुसू नये यासाठी प्रत्येक नोड मध्ये धारण तलाव (होल्डींग पोंड) निर्माण करण्यात आले आहेत. नवी मुंबई शहरातील डोंगर भागातून येणारे पाणी नैसर्गिक पावसाळी नाल्यांद्वारे धारण तलावात येऊन ते पुढे समुद्रात सोडले जाते. सदर नाले कच्चे स्वरुपाचे आहेत. महापालिका मार्फत प्रत्येक वर्षी या नाल्यातील अडथळे दूर करुन पाणी वाहते ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्याच अनुषगाने आता नवी मुंबई शहरातील नाल्यांचे काँक्रीटीकरणे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
तुर्भे विभागातील एपीएमसी वाहतूक पोलीस चौकी ते अरेंजा कॉर्नर सिग्नल पर्यंतच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी या नाल्यात येऊन नाले गाळाने भरलेले असल्याने खाडीतील पाणी अनेकदा थेट रस्त्यावर येण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण होत असते. नाले काँक्रिटीकरणामध्ये नाल्यातील गाळ काढल्याने नाल्याची खोली वाढून पात्रही रुंद होणार आहे. परिणामी भरतीचे पाणी रस्त्यावर येणार नाही. यामुळे तुर्भे विभागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. पावसाळा सोडून दोन वर्षामध्ये सदर नाल्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम पूर्ण करण्याचे कार्याध्यक्ष महापालिका प्रशासनाने दिले आहेत.