पाणी प्रश्नावर रिकामे हंड्यांसह बैलगाडी मोर्चा

कल्याण : मांडा-टिटवाळा परिसरातील गंभीर पाणी टंचाईला कंटाळून स्थानिक नागरिकांनी १७ डिसेंबर रोजी ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांसह बैलगाडीतून कल्याण-डोंबिवली महापालिका अ-प्रभाग क्षेत्र कार्यालयावर रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढला. दरम्यान, पाणी टंचाई प्रश्न लवकर सुटला नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्चेकऱ्यांनी महापालिकेला दिला. या मोर्चामध्ये महिला वर्गासह नागरिक, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धरण आमाच्या ऊशाला कोरड मात्र घश्याला, पाणी आमच्या हक्काचे नाही उप अभियंता सराफांच्या मालकीचे, पाणी आता नियमित मिळालेच पाहिजे, महापालिकेला जाग आलीच पाहिजे, अशा घोषवाक्याचे फलक हातात घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

मागील अनेक महिन्यांपासून मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता कार्यकरी सराफ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीच उपायोजना करण्यात येत नव्हती. अखेर नागरिकांचा संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी संतप्त होत ‘भाजपा'च्या साथीने रिकाम्या हंड्यासह ‘केडीएमसी'च्या अ-प्रभाग कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व ‘भाजपा'चे मोहना मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर यांनी केले. दरम्यान, सदर पाणी टंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तसेच मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास महापालिका मुख्यालयावर मोठ्या संख्येने आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी यावेळी दिला.

सदर मोर्चात ‘भाजपा'चे शक्तिवान भोईर, नवनाथ पाटील, कैलास पाटील, किरण रोठे, विजय आव्हाड, रुपेश भोईर, नवनाथ पाटील, कैलास पाटील, रमेश कोनकर, प्रमोद घरत, सुनील केदारे, दिपक कांबळे, सुभाष पिसाळ, सारिका पाटील, जिगीशा जैसवाल, यामिनी चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते आणि टिटवाळ्यातील नागरिक सहभागी झाले होते.

उपअभियंता सराफ यांची बदलीची मागणी...
 मांडा-टिटवाळा येथील सोसायट्यांना जाणिवपूर्वक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करावी, मोहिली जलशुध्दीकरण केंद्र ते मांडा-टिटवाळा मुख्य पाण्याच्या लाईनवर प्रेशरगेज मशीन बसवावे, मुख्य पाण्याच्या लाईनवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत नळ जोडण्यात आले असून त्यावर कारवाई करावी, पावसाळ्यात नदीतील जलपर्णीमुळे थांबणाऱ्या रॉ वॉटर पंपींगवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, काळू नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवून गळती थांबवावी, अवैध नळ जोडण्यासाठी घेतले जाणारे ३०-४० हजार रुपयांचे गैरव्यवहार थांबवावेत, प्रभागातील सर्व अनधिकृत नळ जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, आदि मागण्या यावेळी मोर्चकऱ्यांनी केल्या.

तर रेल्वे पुलाखालुन पाण्याची लाईन टाकाण्याचे काम १५ जानेवारी पर्यंत पर्ण होणार आहे. तसेच मार्च अखेर पर्यंत मांडा पश्चिम साठी बांधण्यात येणाऱ्या टाकीचे देखील काम पूर्ण होणार असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणीसाठा वाढवण्याबाबत शासनाशी चर्चा सुरु असून सदरचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पाणी समस्या आहे, त्या त्या ठिकाणी व्यक्तीशः भेट देऊन उपायोजना करण्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात येतील, असे घोडे त्यांनी आश्वासित केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे विभागातील नाल्याचे काँक्रीटीकरण सुरु