मेहता महाविद्यालयाचा पॅनोरमा व साय-टेक उत्साहात साजरा
नवी मुंबई : ऐरोलीच्या जे.व्ही.एम. मेहता महाविद्यालयात १६ डिसेंबर रोजी पॅनोरमा व साय-टेक महोत्सव साजरे झाले. या महोत्सवाअंतर्गत विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धांमध्ये मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील पदवी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पॅनोरमा महोत्सवात आर्ट गॅलरी, मेहेंदी आणि नेल आर्ट यांसारख्या कलात्मक स्पर्धांपासून ते अकाऊंटिंग मास्टर, टॅगलाइन आणि ॲड मॅनिया यांसारख्या बौद्धिक चाचण्या घेणाऱ्या स्पर्धांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ‘सब खेलो सब जीतों' आणि थरारक ‘ट्रेझर हंट' यांसारख्या समूह स्पर्धांनी महोत्सवाला अधिक रोमांचक व उत्साही स्वरूप दिले. या महोत्सवात २१ महाविद्यालयांमधल्या १,०५४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित साय-टेक महोत्सवही मेहता महाविद्यालयात उत्साहात पार पडला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित टेक्स्ट-घ्ऊ, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, BGMI स्क्वाड टूर्नामेंट, पोस्टर प्रेझेंटेशन, विज्ञान प्रश्नमंजुषा आणि मिस्ट्री मिंगल अशा विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ महोत्सवात ठेवण्यात आले होते. या महोत्सवात साधारण १३ महाविद्यालयांतील ३९५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पॅनोरमा व साय-टेक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात जे.व्ही.एम. संस्थेचे अध्यक्ष व्ही. एन. हेगडे, कार्यकारी अध्यक्ष के. एच. देशपांडे, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर टंकसाळी व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. आर. देशपांडे उपस्थित होते.
डॉ. किशोर चौहान व प्रा. प्रेमा बर्धन यांनी पॅनोरमा महोत्सवासाठी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. साय-टेक महोत्सवात प्रा. भाग्यश्री कुलकर्णी व डॉ. श्वेता राठोड यांनी समन्वयकाची धुरा सांभाळली.