क्रीडा विभागाच्या आदेशाला केराची टोपली

कारवाई करण्यास ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ -मनसे

ठाणे : घोडबंदर रोड बोरीवडे मैदानावरील अतिक्रमणाबाबत ‘मनसे'ने आक्रमक भूमिका घेत आवाज उठवला आहे. साहित्य साठवण्यासाठी अमृत योजना अंतर्गत करोडो रुपयांचा निधी देऊन सुध्दा ठेकेदारांने बेकायदेशीररित्या मैदानावर कब्जा केला आजे. इतकेच नव्हे, तर ठेकेदाराने चक्क मैदानावर आरएमसी प्लांट बांधल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत क्रीडा विभागाने अखेरीस ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या उपनगर अभियंता तसेच माजीवाडा मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना तातडीने पत्र पाठवून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. पण, कारवाई होतच नाही. त्यामुळे क्रीडा विभागाच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठाणे महापालिकेने बोरीवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण, या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना मैदानापासून वंचित रहावे लागत आहे. येथील ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक भागावर कब्जा केला असून, तिथे शेड उभारुन पाईपची साठवणूक केली आहे. ठेकेदार सदरचे पाईप त्याच्या वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याने स्थानिक नागरिकांना तसेच खेळाडू यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ‘मनसे'चे जनहित-विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या वतीने आवाज उठवला नंतर महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले.

‘मनसे'च्या पाठपुराव्यामुळे अखेर संबंधित प्रशासनाला दखल घ्यावी लागली. सदर मैदानात साहित्य ठेवण्यासाठी तसेच आरएमसी प्लांट साठी ठेकेदाराने कुठलीही महापालिकेच्या विभागाची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. महापालिका क्रीडा विभाग अंतर्गत येत असलेल्या या मैदानावर पूर्णपणे कब्जा करण्यात आला असल्याचे क्रीडा विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर क्रीडा विभागाने तातडीची कारवाई करण्याचे आदेश काढले. मात्र, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी या आदेशाचे पालन करण्यात कुचराई करत आहेत. गेल्या ४ ते ५ महिन्यापासून संबंधित ठेकेदार मैदानावर ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित ठेकेदाराला पाणीपुरवठा विभागाच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे मैदानावर कब्जा केल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग निष्क्रिय झाला असून अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांचे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर लक्ष नसल्याकारणाने जागोजागी अतिक्रमणाचे प्रकार उघडकीस येत आहेत.

सदर विषय खूप गंभीर असून यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा संबंधित ठेकेदाराला वरदहस्त आहे. त्यामुळेच मैदान अजुनही अतिक्रमण मुक्त झाले नसून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यास देखील टाळटाळ होत आहे. आयुक्तांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे अपेक्षित आहे.
-स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित-विधी विभाग, ठाणे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी प्रश्नावर रिकामे हंड्यांसह बैलगाडी मोर्चा