खांदा कॉलनीत १५ लाखांची वीज चोरी उघड
खांदेश्वर : ‘महावितरण'च्या भरारी पथकाने खांदा कॉलनी, सेक्टर-११ मधील हॉटेल चालकाकडून होत असलेली तब्बल १५.२ लाखांची वीज चोरी पकडली आहे. सदर हॉटेल चालकाने वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन तो मागील ४ वर्षापासून वीज चोरी करीत असल्याचे ‘महावितरण'ने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे ‘महावितरण'ने या हॉटेल मालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खांदा कॉलनी, सेक्टर-११ मधील मंगलमुर्ती टॉवर इमारतीतील गाळा नंबर-६ मध्ये हॉटेल फुड कॅस्टल लाऊंज येथे विजेची चोरी होत असल्याची माहिती ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे ‘महावितरण'च्या भरारी पथकाने ४ डिसेंबर रोजी वीज चोरी होत असलेल्या हॉटेल फुड कॅस्टल लाऊंज येथे छापा मारला. त्यानंतर भरारी पथकाने मीटरची पाहणी केली असता, मीटर बॉडी आणि सील संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यानंतर भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी मीटर ब्रेक ओपन केले असता, मीटरमध्ये काळ्या रंगाचा रीमोट कंट्रोल सर्कटिला जोडल्याचे दिसून आले.
यावरुन सदर हॉटेलमध्ये वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने केलेल्या तपासणीत सदर हॉटेल चालवणाऱ्या सुशांत मंडलिक याने मागील ४२ महिन्यांमध्ये ७१,६९९ युनिटस्ची तब्बल १५ लाख २३ हजार ५१० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने सुशांत मंडलिक याच्या विरोधात खांदा कॉलनी पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.