पनवेलमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आलेले त्रिकुट जेरबंद  

नवी मुंबई : पनवेलच्या नेरे भागात पिस्तूल व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने गत रविवारी रात्री सापळा लाऊन अटक केली. पोलिसांनी या त्रिकुटाकडून २ देशी पिस्तूल व १ जिवंत काडतुस जफ्त केले आहे. या त्रिकुटाचा चौथा साथीदार पाच जिवंत काडतुस घेवुन पळुन जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची मारुती स्विफ्ट कार आणि यामाहा कंपनीची मोटारसायकल देखील जप्त केली आहे. या तिघांनी सदरचे पिस्तुल व काडतुस कुठून आणले याचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पनवेलच्या नेरे भागात राहणारे काही तरुण 5 लाख रुपयांमध्ये २ पिस्तुल आणि काडतूस विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अजयकुमार लांडगे व धर्मपाल बनसोडे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील व त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला. तसेच त्यांच्याजवळ असलेले पिस्तुल 5 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शविली.  

त्यानुसार गर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पनवेलमधील नेरे येथील हॉटेल न्यु रॉयल कॅफे व मटण शॉपजवळ सापळा लावला होता. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास किशोर दत्ता धाडी (२४) व ऋषीकेश रघुनाथ लोटे (२५) हे दोघे मारुती स्विफ्ट कार मधून तर यशवंत बबन सत्रे (२४) व अर्जुन जाधव हे दोघे यमाहा मोटारसायकलवरुन त्याठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाकडील ५ लाखांची रक्कम घेतल्यानंतर अनैतिक मनावी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने त्याठिकाणी छापा मारुन सर्वांची धरपकड केली. यावेळी आरोपी अर्जुन जाधव हा त्यावेळी झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन पाच जिवंत काडतुस घेवुन पळुन गेला.  

त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने किशोर, ऋषीकेश आणि यशवंत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ १ लाख २० हजार रुपये किंमतीचे २ देशी बनावटीचे पिस्तुल तसेच १ जिवंत काडतुस सापडले. सदरचे पिस्तुल आणि काडतुन पोलिसांनी जफ्त केले. तसेच सदर आरोपी ज्या वाहनातून आले होते, ती स्विफ्ट डिझायर कार तसेच यामाहा मोटारसायकल देखील पोलिसांनी जफ्त केली. या सर्व आरोपी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपींची १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सायबर भामट्याने लुटलेली २१ लाखांपेक्षा जास्त रक्कम तक्रारदाराला परत