आयएसओ मानकांद्वारे सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो सेवेवर उमटली गुणवत्तेची मोहोर
३ आयएसओ मानांकने प्राप्त करणारी राज्यातील एकमेव मेट्रो सेवा
नवी मुंबई : गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
नवी मुंबई मेट्रो लाईनला परिचालनाच्या पहिल्याच वर्षी तिन्ही आयएसओ प्रमाणपत्र मिळाली आहे. सदर तिन्ही आयएसओ प्रमाणपत्र मिळालेली ही महाराष्ट्रातील एकमेव मेट्रो लाइन आहे. महा मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत ब्रिटीश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन (BSI) द्वारे प्रदान केलेले प्रमाणपत्र सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल सिडको यांना सुपुर्द करण्यात आले.
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आयएसओ मानांकनाद्वारे सिडको मेट्रोच्या उत्कृष्ट परिचालनासह नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाचा सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
ब्रिटिश मानक संस्था (British Standards Institution - BSI) यांच्या तर्फे देण्यात येणारी तीन आयएसओ मानांकने सिडको मेट्रोला, महा मेट्रो रेले कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्राप्त झाली आहेत. आयएसओ ९००१:२०२५ मानांकन हे नवी मुंबई मेट्रोची उच्च दर्जाची सेवा, प्रवाशांचे समाधान आणि परिचालनाची कार्यक्षमता वाढवणे, या निकषावर प्राप्त झाले आहे. आयएसओ १४००१:२०१५ मानांकन हे मेट्रो परिचालनाच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करून पर्यावरणावरील परिणाम कमी करणे, संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे आणि त्या प्रदेशातील पर्यावरणाचे जतन करणे, या निकषावर प्रदान करण्यात आले आहे. आयएसओ ४५००१:२०१८ मानांकन हे मेट्रो परिचालनामध्ये सहभागी कर्मचारी व कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपणे, आरोग्य व सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून कामाच्या ठिकाणी सुरक्षित पर्यावरण सुनिश्चित करणे, या निकषावर प्रदान करण्यात आले आहे.
सिडकोतर्फे महा मेट्रोच्या माध्यमातून नवी मुंबई मार्ग क्र. १ वरील मेट्रोच्या परिचालन व देखभाली संबंधित विविध बाबींकरिता पद्धति आणि नियमांची काटेकोरपणे व सातत्याने अंमलबजावणी करण्यात आली आहे. आयएसओ मानांकनांद्वारे जागतिक मानकांची पूर्तता करण्याच्या आणि मेट्रो सेवेची गुणवत्ता सुधारण्याच्या सिडकोच्या प्रयत्नांवर मोहोर उमटविण्यात आली आहे. सिडकोच्या मेट्रो सेवेला मिळालेले आयएसओ मानांकन हे देशातील मेट्रो प्रणालींकरिता आदर्श ठरणार आहे.
आयएसओ मानांकनांद्वारे उच्चतम दर्जाची मेट्रो सेवा पुरविण्यासह गुणवत्ता, शाश्वतता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सिडकोच्या कटिबद्धतेवर विश्वास दर्शविण्यात आला आहे. नगरविकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सिडकोचे अग्रणी स्थान याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.