ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणाचा उत्सव-महालक्ष्मी सरसचे भव्य उद्घाटन
नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देत, त्यांच्या व्यवसायांना चालना देणाऱया उमेद अभियानाच्या महालक्ष्मी सरस-2024 प्रदर्शनाचे उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मोठा उत्साहात पार पडले. यावेळी परमेश्वर राऊत (अतिरिक्त संचालक, उमेद अभियान), धनवंत माळी (अवर सचिव, उमेद अभियान) आणि मंजिरी टकले आदी मान्यवर उपस्थित होते. घे भरारी-मला पंख मिळाले या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या ताईंनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे एक अत्यंत नावीन्यपूर्ण असे अनोखे व्यासपीठ आहे. यावर्षी 14 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. महालक्ष्मी सरसचे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष असून या प्रदर्शनात 400 पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या , कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे. तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी 70 भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे.
ग्रामीण महिलांच्या कलेचं आणि चवीचं प्रदर्शन:
या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस 2024 हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे.
संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. ग्रामीण महिलांना पाठिंबा देण्यासाठी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले.
ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ असून ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा विश्वास उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. तसेच या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी मोठा संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रुचेश जयवंशी यांनी केले आहे.