मोरावे गावातील खेळाच्या मैदानाचे लोकार्पण

उरण : ‘सिडको'ने नवी मुंबई शहर वसविताना ‘सिमेंट'चे जंगल उभे केले. मात्र, येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडको आराखड्यामध्ये नाहीत. याकरिता झुंजार कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडको तर्फे मोरावे गावाकरता अधिकृत खेळाचे मैदान मंजूर करुन देण्यात आले आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोरावे ग्रामस्थांद्वारे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांचा मोठा सत्कार करण्यात आला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून तसेच श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्‌घाटन करण्यात आले तर कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करण्यात आले.  

स्वर्गीय दि. बा. पाटील तसेच जनार्दन भगत यांनी उरण भागाला मोठा इतिहास दिलेला आहे. अन्यायाविरुध्द पेटून उठून आपला हक्क आपण मिळवण्याची गरज आहे. खेळाच्या मैदानासाठी मोरावे ग्रामस्थांनी चिकाटी सोडली नाही, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे मनोगत यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी उत्तम कोळी, श्रीकांत म्हात्रे, लहू म्हात्रे, मदन पाटील, निलेश खारकर, धावजी पाटील, विनायक पाटील, चंद्रकांत म्हात्रे, सचिन म्हात्रे, मयूर म्हात्रे, यज्ञेश भोईर, प्रणय कोळी, संजय पाटील, अमर म्हात्रे, काशिनाथ म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, चिंतामण गोंधळी, रुपेश ठाकूर, उमेश ठाकूर, संकेत भोईर यांच्यासह मोरावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा फेज-१ मधील आयशा हॉटेल मध्ये अनधिकृत बांधकाम