‘सिंगापूर विद्यापीठ'मधील विद्यार्थ्यांची नमुंमपा भेट

नवी मुंबई : सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देत महापालिकेच्या विविध प्रकल्पांची आणि उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी भारतातील एका आधुनिक शहराला भेट दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

‘रिलायन्स फाऊंडेशन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन ॲन्ड रिसर्च संस्था'द्वारा संचालित ‘जिओ इन्स्टिट्युट'च्या समन्वयातून ‘सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी'च्या १० विद्यार्थ्यांनी त्यांच्या भारत देशाच्या अभ्यासभेटीत नवी मुंबई शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संवाद साधत इतर शहरांपेक्षा नवी मुंबईच्या असलेल्या वेगळेपणाविषयी भाष्य केले. आयुक्त शिंदे यांनी या विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक यांच्याशी चर्चा करीत नवी मुंबई शहराचे वेगळेपण तसेच नवी मुंबईत सुरु असलेले प्रकल्प आणि पर्यावरणशील उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.

भारतातील बाजारपेठ आणि गुंतवणूक याविषयीचा अभ्यास करण्यासाठी आलेला सिंगापूर देशातील सदर अभ्याससमुह भारतात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा वेग आणि त्याचा परिणाम याविषयी माहिती संकलित करीत आहे. तसेच विकास प्रक्रियेत शाश्वत पध्दतींचा वापर करण्याची पर्यावरणपूरक भूमिका याविषयी अभ्यास करीत आहे.

भारतातील कार्यक्षम महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन या स्वच्छतेशी निगडीत बाबींची माहिती घेण्यासाठी या विद्यार्थी समुहाने नवी मुंबईला भेट दिली. यामध्ये त्यांनी पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, कांदळवनांची जपणूक, मियावाकी शहरी जंगल आणि इतर पर्यावरणपूरक उपक्रम-कामे, हवा गुणवत्ता, सौरऊर्जा आणि पदपथांवरील दिव्यांच्या व्यवस्थापनातून वीज बचतीवर दिला जाणारा भर, पुर्नप्रक्रियाकृत पाण्याचा उद्यानांसाठी होणारा वापर अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती जाणून घेतली.

महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी या अभ्यासभेटीच्या समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहिले. सिंगापूर व्यवस्थापन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबतच सदर अभ्यासदौऱ्यात ‘विद्यापीठ'चे मार्केंटींग विभागप्रमुख डॉ. सेशन रामास्वामी, ‘स्टुडन्टस्‌ अफेअर्स'च्या विभागप्रमुख प्रा. सुरिंदर कौर, व्यवस्थापक प्रा. अविनाश झा आणि ‘जिओ इन्स्टिट्युट'चे सुरक्षा विभाग मार्गदर्शक जयेंद्र भोसले उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरावे गावातील खेळाच्या मैदानाचे लोकार्पण