वाहतूक नियमांबाबत स्कुल बस, व्हॅन चालकांमध्ये प्रबोधन
कोपरखैरणे : गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत घडलेल्या काही अपघात घटनांच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे वाहतूक शाखेने कोपरखैरणे मधील क्राईस्ट ॲकॅडमी स्कुल मधील स्कुल बस चालकांना आणि केअर टेकरना मुलांच्या सुरक्षितेविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे आणि त्यांच्या अंमलदारांनी आपल्या हद्दीतील शाळेतील स्कुल बस चालकांचे समुपदेशन करुन त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत धडे देण्यास सुरुवात केली आहे. १४ डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी कोपरखैरणेतील क्राईस्ट ॲकॅडमी स्कुल मधील ५० ते ६० स्कुल बस चालकांना वाहतुकीच्या नियमाबाबत महिती देऊन अपघात कसे टाळायचे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी, अपघातापासून जनतेचा आणि स्वतःचा कसा बचाव करावा, बस मधील विद्यार्थ्यांना घरातून शाळेत आणि शाळेतून घरी सुरक्षितरित्या कसे पोहोचवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर न करणे सिग्नल न मोडणे झेब्रा क्रॉसिंगच्या आधी वाहने थांबवणे या बाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे ड्रंक अँड ड्राइव्ह बाबत बस चालकांची कधीही तपासणी केली जाणार असल्याचे तसेच त्यात दोषी आढळल्यास चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी स्कुल बस आणि व्हॅन चालकांच्या अडचणी देखील समजावून घेण्यात आल्या. त्यावर ८ दिवसात मार्ग काढण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून आश्वासित करण्यात आले.