अवैध वाहतूक ; ‘आरटीओ'ची करडी नजर
वाशी : खासगी बस मधून होणाऱ्या अवैध प्रवाशी वाहतूक व्यतिरिक्त होणाऱ्या मालवाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे कारवाई केली जात असून, यावर्षी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत एकूण ५६४ वाहनांवर कारवाई करुन ८ लाख ३५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
आजही नवी मुंबई शहरातील महामार्गवर काही वाहने विनापरवाना, फिटनेस, विमा, पियुसी नसताना नियमबाह्यपणे चालविली जात आहेत. अनेकदा खासगी बस मधून प्रवाशी वाहतुकीबरोबर व्यावसायिक मालवाहतुक देखील केली जाते. खासगी बसेस या प्रवाशी वाहतुकीसाठी असून, मालवाहतुकीसाठी खासगी बसेसचा वापर करणे नियमात नसताना देखील खासगी बसेस मधून अनधिकृतरित्या मालवाहतूक केली जाते. जादा प्रवाशी वाहतूक, मालवाहतूक करणे इत्यादी अवैध पध्दतीने वाहतूक करणाऱ्या बसवर आरटीओ द्वारे कारवाई करण्यात आली असून, यंदा क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४ दरम्यान ५४५तर एप्रिल-२०२४ ते नोव्हेंबर-२०२४ दरम्यान ५६४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
खासगी बस मधून होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओ द्वारे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु असते. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ तर्फे नेहमीच कारवाई करण्यात येते, अशी माहिती नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली.
एप्रिल २०२३ - मार्च २०२४
एकूण वाहने ४४१३
दोषी वाहने ५४५
निकाली प्रकरणे ३५२
जप्त वाहने ४७
दंड वसूल ९३,७७,१००/- रुपये
एप्रिल २०२४ -नोव्हेबर २०२४
एकूण वाहने ३५९४
दोषी वाहने ५६४
निकाली प्रकरणे ३४३
जप्त वाहने २२
दंड वसूल ८३,५२,२००/- रुपये