अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचा आंदोलनाचा इशारा
डोंबिवली : डोंबिवली स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होत असताना संतप्त फेरीवाल्यांनी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील ‘फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत, फेरीवाला अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अरुण जगताप, कर्मचारी वर्ग यांनी डोंबिवली पूर्व स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई मोहीम हाती घेतली. नागरिकांना व्यवस्थित चालता यावे याकरिता फुटपाथवरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण सदर कारवाईत हटविण्यात आले. कारवाईमध्ये सातत्य असल्याने फेरीवाले पुरते वैतागले आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यास महापालिका प्रशासनाने जागा देणे बंधनकारण असताना जागा दिली जात नाही आणि दुसरीकडे कारवाई होत आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत फेरीवाला संघटनांनी डोंबिवली मधील महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करीत आहेत. फुटपाथवरील अतिक्रमण हटविल्याने नागरिक त्यांच्या कामावर खुश आहेत. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या या कारवाईला ‘फेरीवाला संघटना'ने विरोध दर्शविला आहे. कारवाईत सामानाचे नुकसान, फळे आणि भाज्यांचे नुकसान यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून फुटपाथही नागरिकांना चालण्यास मोकळे झाले. मात्र, सदरचे चित्र काही दिवसच राहते का? की पुन्हा कारवाई थंडावते? ते लवकर दिसेल.
नियमानुसार नोंदणीकृत फेरीवाल्यांना महापालिका प्रशासनाने बसण्यास जागा देणे बंधनकारक आहे. मात्र, तसे न करता अन्यायकारक कारवाई सुरु आहे. महापालिका प्रशासनाने कारवाई थांबवून नोंदणीकृत फेरीवाल्यांना हक्काची जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. कारवाई न थांबल्यास लवकरच आम्ही महापालिका कार्यालयावर मोर्चा काढू.
-बबन कांबळे, अध्यक्ष-कष्टकरी हॉकर्स-भाजी विक्रेता युनियन.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई सुरु आहे. महापालिका प्रशासन अन्यायकारक कारवाई करत नाही. फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले नाही, तर कारवाई होणार नाही. मात्र, स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाले बसल्यास कारवाई नक्की होणार. फुटपाथवर अतिक्रमण केल्यास दुकानदारांवर कडक कारवाई करु.
-संजय कुमावत, सहाय्यक आयुक्त-फ प्रभाग, केडीएमसी.
अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिम विभाग रेल्वे स्टेशन जवळील सुमारे १५० मीटरपेक्षा जास्त परिसर पूर्णपणे फेरीवाला मुक्त झाला आहे. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनिषा धात्रक आणि महापालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विभाग पथकप्रमुख विजय भोईर यांच्या पाठपुराव्याने शक्य झाले. डोंबिवली पश्चिम कडील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथे हातावरील बोटे मोजण्याइतके फेरीवाले होते. तर डोंबिवली पूर्व मधील फेरीवाल्यांची संख्या अफाट असून फक्त ९ हजार नोंदणीकृत फेरीवाले आहेत.