ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे -आ. गणेश नाईक

नेरुळ : वृध्द झाल्यानंतर आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देणारी मुले, तर दुसरीकडे शेवटपर्यंत त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणारी मुले मी पाहिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे हित जपण्यासाठी अनेक निर्णय मी घेतले. वृध्दांचे प्रश्न अलिकडच्या काळात वाढत चालले असून त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे. यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करेन, अशी ग्वाही आमदार गणेश नाईक यांनी नेरुळ येथे दिली.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉम या संघटनेचा ४४ वा वर्धापन दिन १३ डिसेंबर रोजी नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे साजरा झाला. त्यावेळी आमदार नाईक बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर ‘फेस्कॉम'चे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, ‘अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ'चे अध्यक्ष विश्वासराव भदाणे, ‘फेस्कॉम'चे माजी अध्यक्ष अरुण रोडे, दिगंबर चापके, जेनएस एस अध्यक्ष, उपाध्यक्ष अशोक तेरकर, मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी आदि उपस्थित होते.  

समाजात ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व फार मोठे आहे. साहजिकच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मी सरकारमध्ये असताना नेहमी प्रयत्न केले. नवी मुंबईत राहणाऱ्या, त्यातही एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी मदतीची गरज असते, ते माझ्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीने एक सहाय्यता कक्ष महापालिकेत स्थापन करुन त्यासाठी एक मोबाईल नंबर दिला जावा. ज्येष्ठ नागरिकांना अपघात झाला किंवा त्यांच्या घरी अनोळखी इसम घुसण्याचा प्रयत्न करत असो किंवा त्यांच्या घरी कोणाला वैद्यकीय मदतीची गरज असो त्यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क केल्यानंतर काही वेळातच महापालिकेचे पथक त्यांच्या दारी पोहोचले पाहिजे आणि त्यांची समस्या सुटली पाहिजे, असा माझा आग्रह होता, असे नाईक यावेळी म्हणाले.

आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेत तातडीने असा कक्ष स्थापन केला. त्याचा खूप चांगला उपयोग झाला. आजही सदर कक्ष सुरू आहे. अशाच प्रकारे जिल्हास्तरापासून ते ग्रामीण भागापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या काळात मदत मिळण्याची आज गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत पातळी पर्यंत ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन व्हावा यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवणार आहे. त्यांनी बिडीओ ते ग्रामसेवक यांच्यामार्फत आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा यावर माझा भर राहील, असेही ते म्हणाले.

‘फेस्कॉम'चे नवे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांचे प्रश्न पोट तिडकीने मांडले. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी, प्रत्येक पोलीस ठाणेमध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करणे, आरोग्य विभागाच्या सनियंत्रण समित्यांवर ज्येष्ठांना प्रतिनिधित्व देणे, महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणे, यासाठीची जी १.५० लाखांची मर्यादा होती ती ५ लाखांपर्यंत वाढवणे असे अनेक चांगले निर्णय शिंदे सरकारच्या काळात घेतले गेले. यासाठी ‘फेस्कॉम'ने सतत पाठपुरावा केला असे त्यांनी आवर्जुन सांगितले.

यावेळी आपापल्या भागात राहून ज्येष्ठ नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या ‘ज्येष्ठ नागरिक संघ'च्या पदाधिकाऱ्यांचा आ. गणेश नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

चंद्रकांत महामुनी यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर चापके, अरुण रोडे आदिंचीही भाषणे यावेळी झाली. उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी आभार प्रदर्शन केले. दरम्यान, राज्यभरातून ४०० हून अधिक प्रतिनिधी वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईला मंत्री लाभल्यामुळे समस्या सुटण्याची आशा