अंमली पदार्थ तस्करांविरुध्द नवी मुंबई पोलिसांची ‘ऑपरेशन गरुड मोहीम'
नवी मुंबई : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांचे रॅकेट उध्दवस्त करण्याच्या उद्देेशाने नवी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन गरुड अशी विशेष मोहिम राबवून पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबध्द धाडी टाकत १६ परदेशी नागरिकांची धरपकड केली. या धडक कारवाईत १३ परदेशी नागरिक अंमली पदार्थासह सापडले असून त्यांच्याकडून सुमारे १२ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बनावट पासपोर्ट आणि विसा बाळगणाऱ्या ३ परदेशी नागरिकांची देखील पोलिसांनी धरपकड केली आहे. दरम्यान, अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी या वर्षभरात केलेली सदरची तिसरी मोठी कारवाई आहे.
‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या सुचनेनुसार अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी करणारे आणि बेकायदेशीररित्या राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी दिले होते.
त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि गुन्हे शाखेतील तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी १२ डिसेंबर रोजी रात्री ‘ऑपरेशन गरुड मोहीम'द्वारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील खारघर, तळोजा, कोपरखैरणे, उलवे, वाशी या भागातील एकूण २५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनद्वारे छापेमारी केली. या कारवाईत अमली पदार्थांची तस्करी करणारे, तसेच अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या १६ नायजेरीयन नागरिकांची धरपकड करण्यात आली.
यापैकी १३ नायजेरियन नगरिकांजवळ वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. तर ३ जण बनावट पासपोर्ट आणि विसाच्या माध्यमातून अवैधरित्या राहत असल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १२ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाई दरम्यान पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपलेल्या ७३ आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाणेबाबतच्या नोटिसा अदा करण्यात आल्या आहेत.
१२ कोटींचे अंमली पदार्थ जप्त...
सदर कारवाईत २ किलो ४५ ग्रॅम वजनाचे कोकेन (किंमत अंदाजे १०.२२ कोटी रुपये), ६६३ ग्रॅम एम.डी. पावडर (अंदाजे १.४८ कोटी रुपये), ५८ ग्रॅम मिथिलीन (अंदाजे ११.६० लाख रुपये), २३ ग्रॅम चरस (अंदाजे ३.४५ लाख रुपये), ३१ ग्रॅम गांजा (अंदाजे ६ हजार रुपये) असे सुमारे ११.८६ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
‘ऑपरेशन गरुड मोहीम'ची आठवडाभर तयारी...
‘ऑपरेशन गरुड मोहीम'च्या कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी मागील आठवड्याभरापासून नवी मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांवर वॉच ठेवून त्यांची गोपनीय माहिती काढली होती. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी रात्री एकाचवेळी २५ ठिकाणी छापेमारी करुन त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांची तपासणी करुन त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण १५० पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. सदर ‘मोहीम'ची माहिती लिक होऊ नये यासाठी कारवाईसाठी जाणाऱ्या पोलिसांना देखील ऐनवेळी माहिती देऊन या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.