कळंबोलीत अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त

नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली परिसरात सुरु असलेले अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करुन या रॅकेट मधील दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून हेरॉईन तसेच कफ सिरफच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे ६.९० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने आता या रॅकेटमध्ये सहभागी असलेले अंमली पदार्थाचा पुरवठा करणारे पंजाबी ट्रक ड्रायव्हर, त्यांचे हस्तक तसेच अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

कळंबोली परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू आणि त्यांच्या पथकाने ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कळंबोली, सेक्टर-१७ मधील फिनिक्स हाईटस्‌ बिल्डींगजवळ सापळा लावला होता. यावेळी सदर ठिकाणी शिवम अनिल पांडे (२०) अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने अनिल पांडे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ हेरॉईन आणि वेल सिरेक्स कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या.  

त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अनिल पांडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याला फिनिक्स हाईटस्‌ बिल्डींगमध्ये राहणाऱ्या गुरुज्योत कुलमितसिंग रंधावा उर्फ सनी (३१) याने सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने फिनिक्स हाईटस्‌ बिल्डींगमध्ये छापा मारुन गुरुज्योत रंधवा याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये देखील हेरॉईन तसेच इतर अंमली पदार्थ विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम आढळून आली.  

त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अनिल पांडे आणि गुरुज्योत रंधावा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ११ ग्रॅम वजनाचे हेरॉईन, १७ कफ सिरफच्या बाटल्या आणि ४ लाखांची रोकड असा एकूण ६.९० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रॅकेटने कळंबोली परिसरात अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीला सुरुवात केल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुरुज्योत रंधावा आणि त्याचा हस्तक अनिल पांडे या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवाईत अटक केलेल्या दोघांच्या चौकशीत त्यांना गग्गु, निंजा असे पंजाबी ट्रक ड्रायव्हर, त्यांचे हस्तक मोहसिन जेहरीवाला यांच्या मार्फत अंमली पदार्थ पुरवत असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्यासोबत साहील, अमनदिप सिंग, विकी रंधावा सुध्दा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे कळंबोलीत राहणारे सनी विलखु, रिकी सिंग, करण चव्हाण, रुपसिंग हेरॉईन तसेच कोडीन बॉटलचा माल पुरवून त्याची विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ तस्करांविरुध्द नवी मुंबई पोलिसांची ‘ऑपरेशन गरुड मोहीम'