२७ गावे, १४ गावातील जटील पाणीप्रश्न लवकरच सुटणार
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने ‘एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली.
सदर बैठकीत १४ गावे आणि २७ गावांमधील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरुपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा संघटक बंडू पाटील, ज्येष्ठ समाजसेवक दत्ताशेठ वझे, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख विकास देसले, विभाग प्रमुख किसन जाधव, विभागप्रमुख अनिल म्हात्रे, हितेश गांधी आदिंचा समावेश होता.
आमदार राजेश मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली सदर तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावे आणि २७ गावांना पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.