रस्त्यावर-फुटपाथवर अतिक्रमणे; कारवाईची प्रतिक्षा
नवीन पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चा ही प्रभागातील रस्त्यावर तसेच फुटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेले आहेत. मात्र, ड प्रभाग अतिक्रमण विरोधी पथकाडून नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे येथील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नवीन पनवेल रेल्वे स्थानक ते सीकेटी शाळा रस्त्यावर हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना महापालिका अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर कधीही कारवाई होत नाही. अतिक्रमण विभागाची गाडी येणार असेल तर या हातगाड्यावाल्यांना आधीच फोन येतात. यामुळे येथील हातगाडीवाले गल्लीत जाऊन लपतात. रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर मंगलमुर्ती मार्केट येथे खाद्यपदार्थाचे स्टॉल फुटपाथवर वाढत आहेत.
त्यामुळे येथील नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मिळत नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. परिणामी, येथे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच सदर बेकायदेशीर खाऊगल्लीमुळे दररोज घाणपाणी आणि कचरा रस्त्यावर, फुटपाथ तसेच गटारामध्ये टाकला जात असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकंदरीतच वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिका अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.