१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक

ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट) बसविणे बंधनकारक असून, वाहन चालकांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन नंबरप्लेट बसवावी, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी राज्य परिवहन विभाग तर्फे कल्याण उप प्रादेशिक कार्यालयासाठी मे. रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे, असे आशुतोष बारकुल यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी, अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्यात सन-२०१९ पासून नव्या उत्पादित वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची केली असून, वाहनाला हाय सिक्युरिटी नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली हाय सिक्युरिटी नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट ॲल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत घ्ऱ् अशी अक्षरे लिहिलेली असतात, अशी माहिती आशुतोष बारकुल यांनी दिली..

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचे महत्व लक्षात घेता कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (प्एRझ्) बसविणे बंधनकारक असून त्याकरीता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवून घेता येणार आहे. . त्यासाठी दुचाकी आणि ट्रॅक्टर : ४५०/- रुपये (जीएसटी वगळून), तीन चाकी : ५००/- रुपये (जीएसटी वगळून), हलकी मोटार वाहने/ पॅसेंजर कार/ मिडियम कमर्शियल वाहन/ अवजड कमर्शियल वाहन आणि ट्रेलर/ कॉम्बिनेशनः७४५/- रुपये (जीएसटी वगळून) असे शुल्क निर्धारित केले आहे. नियुक्त केलेली एजन्सी आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रँचायझी सुरु करुन वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. याबाबतची माहिती आणि निर्देश एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक लवकरच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे, असेही  आशुतोष बारकुल यांनी सांगितले.

राज्य परिवहन विभाग तर्फे ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावून मिळणार आहे. - आशुतोष बारकुल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - कल्याण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी बिल थकबाकी ; १७८० नळ जोडण्या खंडित