बहराई फाउंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम
उरण : उरण तालुक्यातील वेश्वी येथील श्री एकविरा देवी मंदिर परिसरात बहराई फाउंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
काही दिवसांपूर्वी श्री एकविरा देवी मंदिर परिसरात पक्षी निरिक्षणासाठी गेलेल्या ‘बहराई फाउंडेशन'च्या सदस्यांनी तिथला कचरा पाहिला होता. श्री एकविरा देवी मंदिर सभोवताली प्लास्टिक सोबत दारुच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला होता. त्याचवेळी तिथे स्वच्छता करण्याची गरज असल्याचे ‘बहराई फाउंडेशन'च्या सदस्यांच्या लक्षात आले. या ठिकाणी अगदी पायथ्यापासून ते वर मंदिर पर्यंत आणि मंदिरापासून पुढे रानात घेऊन जाणाऱ्या तिथल्या दोन पायवाटा परिसर पक्षी निरिक्षणासाठी उत्तम आणि नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असा आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता आणि शांतता टिकून ठेवणे, सर्वांचीच जबाबदारी आहे, अशी भावना ‘बहराई फाउंडेशन'चे सदस्य वैभव पाटील यांच्याबरोबर सर्वच सदस्यांनी व्यक्त केली.
सकाळी ७ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत म्हणजे साधारण पाच तास चाललेल्या स्वच्छता मोहीम दरम्यान, श्री एकविरा देवी मंदिर परिसरातून जमा केलेल्या कचऱ्यात प्लास्टिक आणि दारुच्या बाटल्यांचे प्रमाण खूप होते. निसर्गभान जागृत ठेवून, नैसर्गिक सौंदर्याला आपल्याकडून कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे, हाच संदेश ‘बहराई फाउंडेशन'च्या सदस्यानी कृतीतून समाजाला देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता मोहीम मध्ये अंकिता ठाकूर, रामनाथ पाटील, महेश पालकर, विशाल ठाकूर, दौलत पाटील, तुषार पाटील, सुरेंद्र पाटील, वैभव पाटील यांच्यासह ‘बहराई फाउंडेशन'चे अन्य सदस्य सहभागी झाले होते.