रस्ते सुधारणांसाठी ‘नमुंमपा'ची तत्पर तक्रार निवारण प्रणाली

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहण्याकरिता वार्षिक देखभालीचा करार करण्यात आला असून रस्ते खड्डेमुक्त असावेत याची विशेष काळजी घेतली जात आहे. रस्ते बनवितानाच त्यांचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असून काही कारणांमुळे रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती तत्परतेने करण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे या बाबींकडे काटेकोर लक्ष असून शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली सदर कार्यप्रणाली तत्परतेने कार्यरत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांबाबतच्या तक्रारी नागरिकांना सुलभतेने नोंदविता याव्यात या दृष्टीने महापालिकेने ‘तक्रार निवारण प्रणाली'ची अर्थात ‘ग्रीव्हेन्स रिड्रेसल पोर्टल'ची निर्मिती केली असून नागरिक महापालिकेच्या  nmmc.gov.in   या वेबसाईटवरील  Grievance   पोर्टलवर सहजपणे तक्रार नोंदवू शकतात.

सदर तक्रार नोंदविण्याकरिता ८४२४९४९८८८ असा व्हॉटस्‌ॲप क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. याशिवाय रस्त्यांवर खड्डे असल्यास त्यांच्या सुधारणेसाठी खड्ड्याची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील चौकाचौकात व्हॉटस्‌ॲप क्रमांक आणि ‘तक्रार निवारण पोर्टल'चा तपशील दर्शविणारे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहे. याद्वारे प्राप्त तक्रारी अभियांत्रिकी विभागाकडील ‘दक्ष ॲप'च्या माध्यमातून महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडे त्वरित पाठविल्या जातात आणि त्यांचे २४ तासात निराकरण केले जाते.

या ‘तक्रार निवारण प्रणाली'द्वारे रस्ते तसेच रस्त्यांशेजारील गटारे, पदपथ यांच्याही तक्रारी प्राप्त होत असतात आणि त्यांचेही निराकरण तत्परतेने केले जाते.

नागरिक आपल्या रस्ते, गटारे, पदपथ या विषयीच्या तक्रारीसाठी ८४२४९४९८८८ तसेच विद्युत विषयक तक्रारीसाठी ८४२१०३३०९९ आणि पाणीपुरवठा विषयक तक्रारीसाठी ८४१९९००४८०१ या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर संपर्क साधून छायाचित्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय १८००२२२३०९/ २३१० या दोन टोल फ्री क्रमांकावरही नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच महापालिकेच्या  nmmc.gov.in   या वेबसाईटवरही  Grievance पोर्टलवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

‘नमुंमपा'च्या वतीने सुरु असलेले प्रकल्प आणि नागरी सुविधा कामे यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी विभागाने ‘एनएमएमसी दक्ष  (NMMC Daksh)' ॲप कार्यान्वित केले आहे. सदर ‘एनएमएमसी दक्ष ॲप'मुळे नागरिकांकडून प्राप्त तक्रारींवर तत्पर कार्यवाही करणे शक्य होत असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने कामात अधिक गतीमानता आणि पारदर्शकता आलेली आहे.

नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहराचा सुनियोजित आणि गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर असा नावलौकिक कायम राखण्यासाठी ‘तक्रार निवारण प्रणाली'चा सुयोग्य वापर करुन संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील